शंभुराज देसाईं आक्रमक


अंधारे-धंगेकर याना नोटीस पाठवणार
पुणे :
शहरातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणावरुन पुण्यातील पब संस्कृतीचा पर्दाफाश करणाऱ्या व सरकारला धारेवर धरणाऱ्या आंदोलक आमदार रवींद्र धंगेकर व शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, अंधारे व धंगेकर यांनी पुण्यातील एक्साईज कार्यालयात जाऊन पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. त्यावेळी, मंत्री शंभुराजे देसाई यांचेही नाव घेतल्याने आता मंत्री महोदयांनी इशारा दिला आहे. माझ्याकडे नोटीस तयार आहे, पुढील 72 तासांत मी संबंधितांना नोटीस बजावणार असल्याचं देसाई यांनी म्हटलं आहे.
आमदार रवींद्र धंगेकर व सुषमा अंधारे यांनी उत्पादक शुल्क कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना चक्क भ्रष्टाचारी हफ्त्याचे रेटकार्डच वाचून दाखवलं होतं. तसेच, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही केली होती. त्यावर, आता उत्पादन शुल्कमंत्री शंभुराजे देसाई आक्रमक झाले आहेत. याबाबत मंत्री देसाई म्हणाले की, विधानसभा सदस्य पुणे रविंद्र धंगेकर व सुषमा अंधारे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे येथे शासकिय कार्यालयात जाऊन जाब विचारला. पुण्यात घडलेल्या घटनेनंतर पोलिस उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. मात्र, आंदोलन करताना खोक्यावर व हातात पैसे घेऊन आंदोलन केले. माझा फोटो त्यावर होता, मला ते व्हिडिओ आले मी प्रवासात पाहिलं. त्यामुळे, मी त्यांना नोटीस बजावणार आहे. रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी आरोप केले होते. यापूर्वी ललित पाटील प्रकरणात माझं नाव सुषमा अंधारे यांनी घेतलं होतं. त्याचवेळी मी स्पष्ट केलं होतं की अंधारे यांनी वक्तव्य मागे घ्यावे. त्यांनी ते मागे घेतलं नाही. सध्या पाटण कोर्टात याप्रकरणी तारीख पडत आहे. न्यायालयाची सुट्टी संपली की मी कोर्टाला विनंती करणार आहे की, लवकरच ललित पाटील प्रकरणी तारीख द्यावी आणि माझी बाजू ऐकून घ्यावी.
निवडणुका असल्याने मी गेलो नव्हतो जबाब नोंदवायला. मात्र, आता जाईन. आधीच कोर्टात केस असताना पुन्हा पुन्हा माझावर आरोप करत आहेत. मी आज धंगेकर आणि अंधारे यांना पुन्हा नोटीस बजावत आहे. तीन दिवसात त्यांनी त्यांची विधानं मागे घ्यावीत. जर, त्यांनी विधानं मागे घेतली नाहीत, तर मी पुढे कायदेशीर कारवाईसाठी हालचाल करीन, अशा शब्दात मंत्री शंभूराजे देसाई यांनी पुणे प्रकरणात आमदार रवींद्र धंगेकर व सुषमा अंधारे यांना थेट इशाराच दिला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!