गेम झोनमधील आगीत 27 जणांचा मृत्यू,
राजकोटमधील घटना, मृतांमध्ये लहानग्यांचा समावेश
राजकोट
गुजरातच्या राजकोटमधील मॉलमध्ये आगीची भीषण घटना घडली. मॉलमधील गेम झोनमध्ये लागलेल्या या आगीत मृत्यू झालेल्यांचा आकडा 27 वर पोहोचला आहे.राजकोटमधील नाना मावा रोडवर हा मॉल असून, तिथे गेम झोन आहे. या गेम झोनमध्ये लहान मुलं होती. त्यामुळे या आगीतील मृतांमध्ये लहान मुलांचा अधिक समावेश आहे मात्र, या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.
राजकोटचे पोलीस आयुक्त राजू भार्गव म्हणाले की, “आतापर्यंत 20 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. युवराज सिंग सोलंकी हा या गेमझोनचा मालक आहे. आम्ही या प्रकरणी मृत्यू आणि निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदवू. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर पुढील तपास करू.”
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मृतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाईची घोषणा केली आहे.
भूपेंद्र पटेल म्हणाले की, “राजकोटमधील आगीची दुर्दैवी घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांप्रती आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी मनःपूर्वक शोक व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. राज्य सरकार मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत करेल.”
तसंच, जखमींवर तातडीने उपचार करण्यासाठी व्यवस्था उभारण्याचे आदेश दिल्याची माहितीही भूपेंद्र पटेल यांनी एक्सवरून दिली.
