पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा


मुंबई
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालकरश्मी शुक्ला यांची बदली केली होती.त्यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रश्मी शुक्लांच्या बदलीनंतर राज्याच्या मुख्य सचिवांनी नवीन महासंचालकांच्या नियुक्तीसाठी तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे निवडणूक आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश दिले होते. यात मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सेवेतले वरिष्ठ अधिकारी संजय वर्मा आणि रितेश कुमार या तीन नावांचा समावेश होता. अखेर आज वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
संजय वर्मा 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते महाराष्ट्रात कायदा आणि तंत्रज्ञान विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालकपदासाठी संजय वर्मा यांचे नाव आघाडीवर होते. एप्रिल 2028 मध्ये ते पोलीस सेवेतून निवृत्त होतील
रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधकांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे त्या वारंवार वादात अडकल्या होत्या. याआधी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फोन टॅप केल्या प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या चर्चेत आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी रश्मी शुक्ला अवैध पद्धतीने फोन टॅपिंग करत असल्याचा आरोप केला होता. नवाब मलिक यांनी शुक्ला या भाजपच्या एजंट असल्यासारखं काम करतात, असा आरोप केला होता. रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीसांच्या खूप जवळच्या अधिकारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सतत होत असते.
रश्मी शुक्लांच्या बदलीनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. यानंतर आता राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!