कोण जिंकणार आयपीएल ?


कोलकाता विरुद्ध हैदराबाद यांच्यामध्ये अंतिम सामना
नवी दिल्ली
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर क्वालिफायर 2 मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबाद टीमनं राजस्थान रॉयल्स संघाचा पराभव करीत आयपीएल फायनलमध्ये धडक मारली आहे. आता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये रविवारी (26 मे 2024) फायनल मॅच होईल.चेपॉक स्टेडियमवर होणाऱ्या या मॅचमध्ये कोण जिंकेल, याकडे क्रिकेटप्रेमीचं लक्ष लागलं आहे. ही मॅच सनरायझर्स हैदराबाद जिंकू शकेल, असा विश्वास हैदराबादच्या चाहत्यांना वाटतोय.
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादनं आयपीएल स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत फायनल गाठली आहे. आयपीएल लिलावात हैदराबादनं पॅट कमिन्सला विक्रमी 20.75 कोटी रुपये मोजत विकत घेतलं होतं. त्यानंतर हैदराबादच्या लिलावाच्या रणनीतीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली टीम फायनलला गेल्यानंतर टीकाकारांना चोख प्रत्युत्तर मिळालं आहे. आता हैदराबादची टीम फायनलमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील केकेआरचा पराभव करेल का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण या टीमशी संबंधित 3 योगायोग आहेत, ज्या आधारे असं म्हणता येईल की सनरायझर्स हैदराबाद तिसऱ्यांदा चॅम्पियन होऊ शकते. हे योगोयोग नेमके काय आहेत, ते जाणून घेऊ.
आतापर्यंत ऑस्ट्रेलियन कॅप्टन हा सनरायझर्स हैदराबादसाठी लकी चार्म ठरला आहे. ॲडम गिलख्रिस्ट या टीमचा आयपीएल 2009 मध्ये कॅप्टन होता. तर आयपीएल 2016 मध्ये डेव्हिड वॉर्नर कॅप्टन होता. 2009 व 2016 या दोन्ही वेळेला हैदराबाद टीमनं आयपीएल विजेतेपद पटकावल होतं. पण आयपीएल 2018 च्या फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता, तेव्हा मात्र या टीमचा कॅप्टन केन विल्यमसन होता. आता मात्र ऑस्ट्रेलियन खेळाडू कमिन्सच्या नेतृत्वाखाली हैदराबादनं फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन कॅप्टन पुन्हा संघासाठी लकी चार्म ठरेल, अशी आशा हैदराबादच्या चाहत्यांना आहे.
सनरायझर्स हैदराबादनं चौथ्यांदा आयपीएल फायनल गाठली आहे. या टीमनं पहिल्यांदा आयपीएल फायनल 2009 मध्ये खेळली होती. त्यावेळी या टीमचं नाव डेक्कन चार्जर्स हैदराबाद होतं. यानंतर सनरायझर्स हैदराबादनं आयपीएल 2016 मध्ये फायनलमध्ये धडक मारली होती. तर, तिसऱ्यांदा 2018 मध्ये फायनलमध्ये धडक मारली होती. यासोबतच आता कमिन्सच्या नेतृत्वाखाली या टीमनं फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. एकंदरीत, रविवारी होणारी आयपीएल फायनल नेमकी कोण जिंकणार, याकडे क्रिकेटप्रेमीचं लक्ष लागलं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!