भारतीय औषधेही संशयाच्या भोवऱ्यात
दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने माघारी
नवी दिल्ली :
भारतातील मसाला कंपन्यांवरील बंदीचे प्रकरण ताजे असतानाच आता भारतीय कंपन्यांची औषधेही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत.दर्जात त्रुटी आढळून आल्याने कंपन्यांवर आपली औषधे परत मागवण्याची वेळ आली आहे. यात डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, सन फार्मा आणि अरबिंदो फार्मा या कंपन्यांचा समावेश आहे.
अमेरिकेतील फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन या संस्थेने भारतातून आयात केल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांच्या दर्जाबाबत आणि सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. सन फार्मा एम्फोटेरिसिन बी लिपोसोमच्या 11,000 पेक्षा जास्त कुपी परत मागवत आहे. हे एक अँटिफंगल औषध आहे. अमेरिकन औषध नियंत्रकांना तपासणीत या इंजेक्शनचा दर्जा चांगला नसल्याचे आढळले आहे.ऑरोबिंदो फार्मा क्लोराझेपेट डिपोटॅशियम गोळ्यांच्या १३,००० हून अधिक बाटल्या परत मागवत आहे. हे एक तणाव आणि चिंता दूर करणारे औषध आहे. या गोळ्यांवर पिवळे डाग आढळल्याने परत मागवावे लागले आहे.एफडीसी लिमिटेड कंपनीने टिमोलॉल मॅलेट ऑप्थॅल्मिक सोल्युशनची ३,८०,००० युनिट्स परत मागवली. काचबिंदूच्या आजारात लागणाऱ्या या औषधाच्या कंटेनरमध्ये छेडछाड केल्याचे आढळून आले होते.डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज झिव्हिगेटर (सॅप्रोप्टेरिन डायहायड्रोक्लोराइड) या औषधाचे सुमारे २० हजार बॉक्स परत मागवत आहेत. फिनिलकेटोन्यूरिया असलेल्या रुग्णांसाठी हे वापरले जाते. त्याला फेफरे येणे, असेही म्हणतात. या आजारावर ही औषधे परिणामकारक नाहीत, असे आढळून आले आहे.
