‘ज्योतिर्मय दीपावली २०२६’ अंकाचा प्रकाशन सोहळा संपन्न


नवोदित साहित्यिकांना विनामूल्य व्यासपीठ” — संजय व्यापारी*

सातारा

Advertisement

कोजागिरी पौर्णिमेच्या मंगल पर्वावर दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा व ज्योतिर्मय प्रकाशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ज्योतिर्मय दीपावली २०२६’ या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल, शनिवार पेठ, सातारा येथे रविवार दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मोठ्या उत्साहात पार पडला.दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक व चेअरमन तथा ज्येष्ठ साहित्यिक शिरीष चिटणीस यांच्या शुभहस्ते अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी नवोदित कवी व लेखकांचा सत्कार ज्योतिर्मयचे संपादक संजय व्यापारी यांच्या हस्ते करण्यात आला.
‘ज्योतिर्मय दिवाळी २०२६’ अंकात साताऱ्याच्या साहित्यिक ॲड. शुभदा कुलकर्णी, वैशाली महाडिक, रंजना सानप, स्नेहल यादव, सुरेखा शेजवळ, रूपाली गुरव, विजया देशपांडे तसेच प्रदीप केळुस्कर यांच्या साहित्याचा समावेश आहे. या कार्यक्रमास भावी लेखक म्हणून विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि सातारा परिसरातील लेखिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी श्रीराम नानल, सुहास पुराणिक, अंजली चिटणीस, निल चिटणीस, शुभम व्यापारी, प्राचार्य राजेंद्र शेजवळ आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रकाशन सोहळ्यात बोलताना संजय व्यापारी म्हणाले, “दिवाळी अंक ही केवळ पानांची पुस्तिका नसून मराठी भाषा, संस्कृती व विचारांची परंपरा पुढे नेणारी सामाजिक चळवळ आहे. दिवाळीत फराळासोबतच वाचनाची आणि विचारांची समृद्धी मिळणे गरजेचे आहे. ‘ज्योतिर्मय’ हे साहित्याला वाहिलेले दैनिक असून, नवोदित लेखक आणि कवींना कोणत्याही प्रसिद्धीच्या अपेक्षेविना आपले विचार मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.”
शिरीष चिटणीस यांनी आपल्या भाषणात पुस्तके मानवी जीवन कसे घडवतात आणि वाचनाची प्रक्रिया किती महत्त्वाची आहे, हे अधोरेखित केले. जगभरात ६३ भाषांमध्ये भाषांतरित झालेल्या व कोट्यवधी प्रती खपलेल्या ‘द बुक थिफ’ या पुस्तकाची कथा सांगून, हुकूमशाही किंवा कठीण काळातही पुस्तकांनी मानवी मूल्ये कशी जिवंत ठेवली, याचे प्रभावी उदाहरण त्यांनी दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुरेखा शेजवळ यांनी केले, तर आभार रूपाली गुरव यांनी मानले. यावेळी तबला व पेटीच्या तालावर रमेश महामुलकर व श्रीनाथ सावंत यांनी स्वागत गीत सादर केले.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!