वाचनाने व्यक्तिमत्त्व विकासाला गती मिळते:डॉ संदीप श्रोत्री


जनवाचक चळवळीतर्फे बनवडी शाळेला पुस्तकभेट

सातारा
वाचनामुळे व्यक्तिमत्त्व विकासाला गती मिळते, मन समृद्ध होते आणि भविष्यातील करिअरची निवड करणे सोपे जाते, असे प्रतिपादन डॉ. संदीप श्रोत्री यांनी केले.कोरेगाव तालुक्यातील बनवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जनवाचक चळवळीतर्फे पुस्तक प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्रोत्री बोलत होते. निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने मन सुसंस्कृत आणि विशाल बनते, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना निसर्गाचे महत्त्व विशद केले. गेली दहा वर्षे जनवाचक चळवळ वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी प्रभावीपणे कार्यरत असल्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.
प्रारंभी जयदीप घोरपडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मुख्याध्यापक सतीश जाधव यांनी शाळेतील उपक्रमांची माहिती देऊन भविष्यातही चळवळीला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या वेळी विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकांविषयी मनोगते व्यक्त केली. त्यांना अनेक नामवंत लेखकांची ओळख असल्याचे यातून दिसून आले.
जनवाचक चळवळीचे संस्थापक समन्वयक श्रीराम नानल यांनी गेल्या दहा वर्षांतील कार्याचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील शाळा आणि वाचनालयांना पुस्तके उपलब्ध करून देऊन वाचनसंस्कृती रुजविण्याचे काम समाजाच्या सहकार्याने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. संदीप श्रोत्री यांच्यासह दैनिक प्रभातच्या सातारा आवृत्तीचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे, चंद्रशेखर टिळक, शिरीष चिटणीस आणि सुनील शेडगे यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे त्यांनी नमूद केले. सहसमन्वयक किरण गाडे यांच्या योगदानाचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.
सरपंच ज्योती कोरडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सारिका नलगे, रूपा कांबळे आणि गोसावी कुटुंबीय उपस्थित होते. प्रतिभा घोरपडे यांनी आभार मानले, तर सुनील शेडगे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी साक्षी वेदपाठक आणि भाग्यश्री जाधव यांनी परिश्रम घेतले.
वृक्षराजीच्या सान्निध्यात मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांना रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनची आठवण करून दिली.

Advertisement

फोटो ओळ
सर्व विद्यार्थ्या समवेत डॉक्टर संदीप श्रोत्री, ज्योती कोरडे, सारिका नलगे, सतीश जाधव, श्रीराम नानल व अन्य मान्यवर


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!