पवारांच्या ठाकरेंना कानपिचक्या
सांगलीवरून मविआमध्ये धुसफूस सुरूच
सांगली :
महाविकासआघाडीचं जागावाटप पार पडलं, मात्र या जागावाटपानंतरही सांगली लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या तिढ्यामुळं मविआत आलबेल नसल्याचं समोर आलंय.सांगलीची अशी एकच जागा आहे जिथे आमचा चर्चा न होताच निर्णय झाला, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे. मविआचं जागावाटप जाहीर होण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली, विशेष म्हणजे या जागेवर काँग्रेसनं दावा सांगितलेला होता.
सांगलीच्या उमेदवारीबाबत आता पवारांनी हे विधान केलंय, त्याला नाना पटोले यांनीही दुजोरा दिला आहे.
सांगलीची अशी एकच जागा आहे जिथे आमचा चर्चा न होताच निर्णय झाला, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे. तर जयंत पाटलांनीही या जागेच्या उमेदवाराबाबतच्या निर्णयाशी आपला काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय. या मतदारसंघात बऱ्याच चर्चा होतात. सगळ्यांना असं वाटतं की मीच चंद्रहार पाटलांना उमेदवारी द्यायला लावली, असं जयंत पाटील म्हणाले.
विशाल पाटील भाजपचा फायदा व्हावा म्हणून निवडणूक लढवत असल्याचा आरोप ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी केलाय. संजय राऊतांनीही त्यांचीच री ओढली आहे. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटील यांच्या आरोपांना जास्त महत्व देत नसल्याचं सांगितलं.