रायबरेलीत राहुल गांधी
अमेठीत निष्ठावंत किशोरी लाल शर्मा यांना संधी
नवी दिल्ली
उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी या जागांवरून काँग्रेसचा सस्पेन्स अखेर संपला असून शुक्रवारी पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्यात आले. काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत रायबरेलीतून राहुल गांधी याना तर अमेठीतून किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
अमेठीतून प्रियांका गांधी निवडणूक लढतील अशी चर्चा होती. पण नव्या यादीमुळे या चर्चांना पूर्णविराम लागला. राहुल गांधी आज रायबरेलीत अर्ज दाखल करणार आहेत. रायबरेलीत राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपचे दिनेश सिंग निवडणूक लढत आहेत.किशोरी लाल शर्मा हे गांधी कुटुंबियांचे निकटवर्तीय मानले जातात. रायबरेलीत सोनिया गांधी खासदार होत्या. गांधी कुटुंबियांचे निकटवर्तीय असलेले किशोरी लाल शर्मा भाजपच्या स्मृती इराणी यांच्याविरुद्ध निवडणूक लढणार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना हरवलं होतं. सोनिया गांधी आणि राहुल गांधी दिल्लीहून रायबरेलीला अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले आहेत.
केएल शर्मा हे मूळचे पंजाबचे असून ते पहिल्यांदा १९८३ मध्ये काँग्रेस कार्यकर्ता म्हणून अमेठीत आले. ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जवळचे होते. अमेठीतच राहून त्यांनी पक्षासाठी काम केलं. १९९१ मध्ये राजीव गांधींच्या मृत्यूनंतर ते अमेठीत काँग्रेसला भक्कम करण्यासाठी काम केलं. १९९९ मध्ये सोनिया गांधींच्या निवडणूक प्रचारात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. तेव्हा निवडणूक जिंकून सोनिया गांधी पहिल्यांदा संसदेत पोहोचल्या होत्या.
