आव्हानात्मक भूमिका आवडतात :गौरी देशपांडे
साताऱ्यातील गौरव समारंभात विशेष मुलाखत
सातारा
मला चांगल्या व आव्हानात्मक भूमिका करायला आवडतात तसेच एकाच प्रकारच्या भूमिका न स्वीकारता विविधतापूर्ण भूमिका स्वीकारायच्या असे मी ठरवले आहे,असे आत्मविश्वासपूर्वक उद्गार अभिनेत्री गौरी देशपांडे यांनी काढले. श्यामची आई या चित्रपटात श्यामच्या आईची भूमिका करणाऱ्या गौरी देशपांडे यांना पदार्पणातच महाराष्ट्र टाइम्सचा उत्कृष्ट अभिनेत्री व व फिल्म फेअर मराठी विभाग यातही उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. यानिमित्ताने आम्ही पुस्तक प्रेमी समूह व दीपलक्ष्मी पतसंस्था मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा गौरव समारंभ आयोजित केला होता. डॉक्टर संदीप श्रोत्री व अभिनेता आदिश पायगुडे यांनी त्यांची मुलाखत घेतली त्यावेळी गौरी देशपांडे बोलत होत्या.
पुस्तक प्रेमी समूहाचे समन्वयक श्रीराम नानल यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.

विनोद कुलकर्णी यांची कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सातारकरा तर्फे गौरी देशपांडे यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला. शिरीष चिटणीस यांचा सत्कार श्रीराम नानल यांनी केला.
गौरी देशपांडे यांची मुलाखत डॉक्टर संदीप श्रोत्री व अदिश पायगुडे यांनी घेतली. त्यामध्ये त्यांच्या अभिनय कारकीर्दीचा प्रारंभ ,त्यात आलेल्या अडचणी याचा विस्तार पूर्वक उल्लेख झाला. पदव्युत्तर शिक्षण प्राप्त करून सुद्धा अभिनय क्षेत्रात प्रवेश घेताना आई-वडिलांचा प्रारंभी विरोध झाला नाही का असे विचारले असता गौरी देशपांडे यांनी सुरुवातीला असा विरोध होताच हे मोकळेपणाने सांगितले. पण नंतर मात्र आई-वडिलांनी उत्तेजनच दिले असे त्या म्हणाल्या. पायगुडे यांनी या क्षेत्रात येणाऱ्या नवीन युवक युवतींना काय सांगाल असे विचारले असता संधी खूप आहे पण परिश्रमाची खूप गरज आहे आणि प्रारंभी अपयश आले तरीसुद्धा न डगमगता या क्षेत्रातला प्रवास चालू ठेवावा असे त्या म्हणाल्या.
श्यामच्या आईच्या भूमिकेसाठी जे पुरस्कार मिळाले त्यात दिग्दर्शक सुजय डहाके व संपूर्ण टीमचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात वेगळे वेगळे रोल करायला आवडेल असे म्हणताना प्रेक्षकांनी अशा भूमिकांचे स्वागत करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या रंगलेल्या मुलाखतीनंतर सातारकर प्रेक्षकांनी त्यांना अनेक प्रश्न विचारून अधिक बोलके केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात शिरीष चिटणीस यांनी गौरी देशपांडे यांचेवर वाचन संस्कृतीचा प्रभाव असल्याने त्यांची अभिनय क्षेत्रातील वाटचाल अधिक सुलभ झाल्याचे त्यांनी सांगितले.गौरी देशपांडे यांनी शाळा-शाळा मध्ये प्रबोधन करावे अशी अपेक्षा व्यक्त करुन भविष्यकालीन कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ज्येष्ठ मुद्रक विशाल देशपांडे यांनी केले तर सूत्रसंचालन सौ सारिका देशपांडे यांनी केले.
