महात्मा फुलेंना समग्रपणे समजून घेणे आवश्यक :प्रा. मिलिंद जोशी


‘युगप्रवर्तक महात्मा जोतिबा फुले’ या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे
महापुरुषांना जातींच्या चौकटीत बंदिस्त करून त्यांच्या विचारांचे आणि दूरदृष्टीचे संकुचीकरण केले आहे. मुळात या थोर युगप्रवर्तकांना समजून घेण्यात आपण गल्लत करीत असून महात्मा फुले यांच्यासह सर्व युगप्रवर्तकांना आपण समग्र दृष्टीने समजून घेणे आवश्यक आहे, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यध्यक्ष, प्रसिद्ध लेखक आणि वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

Advertisement

संस्कृती प्रकाशन,पुणेतर्फे प्रकाशित आणि वि.दा. पिंगळे लिखित ‘युगप्रवर्तक महात्मा जोतिबा फुले’ या पुस्तकाचे प्रकाशन ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्रा. जोशी बोलत होते .
यावेळी व्यासपीठावर संस्कृती प्रकाशनच्या संचालक सुनिताराजे पवार, लेखक वि.दा. पिंगळे, प्रमुख पाहुणे फ्रिक्शन वेल्डींग टेक्नॉलॉजी प्रा. लि. पुणेचे संस्थापक-संचालक यतीन तांबे आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथालय, सिंहगड रोड, पुणेचे अध्यक्ष राहुल कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम झाला .
यावेळी बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले होते. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे त्यांनी जाणले होते. थॉमस पेन यांच्या विचारांनी प्रभावित होऊन फुले यांनी भारतीय समाजरचनेत मानवता धर्माचा पुरस्कार करून त्याचा आग्रह धरला. त्या मानवता धर्माला अनुसरून त्यांनी तत्कालीन समाजात रूढ चलीरिती, समान आणि धर्माची पुनर्चिकित्सा केली. ब्रिटीशांना हाकलून आपण भारतात राजकिय गुलामगिरीतून मुक्त होऊ परंतू सामाजिक स्वातंत्र्य नाही मिळाले तर मिळालेले राजकिय स्वातंत्र्य फोल ठरेल, असे त्यांचे म्हणणे खरे होते. अलिकडचे सामाजिक वातावाण बिघडलेले असून घटनेत नमूद केलेली मूल्ये घटनेतच राहत आहेत. पूर्वी ८०% समाजकारण आणि २०% राजकारण असे समीकरण होते आणि आता ९५% राजकारण आणि जमल्यास ५ % समाज कारण केले जात आहे. हा पुरोगामी महाराष्ट्राचा पराभव असून महाराष्ट्रचे पुरोगामीत्व अफवा आहे की काय असा प्रश्न पडतो. भारताच्या स्वातंत्र्यला ७७ वर्ष होत असताना जाती-पातीच्या मानसिकतेमुळे सामाजिक सलोख्याची वीण उसवत चालली आहे.
यावेळी बोलताना डॉ. रवींद्र शोभणे म्हणाले की, महात्मा फुलेंच्या वैचारिक बैठकीस अभ्यासाचे अधिष्ठान होत. महात्मा फुलेंची संपूर्ण वैचारिक मांडणी काळाच्या आणि शतकांच्या पलिकडची होती. तत्कालिन कठिण सामाजिक परिस्थितीत फुलेंनी निर्भयपणे त्यांचे विचार मांडले. “गुलामगिरी” सारख्या ग्रंथातून भारतीय मिथके ज्या अंगाने मांडली आहेत त्यावरून म. फुले यांच्या विचारांची झेप लक्षात येते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह आणि संस्कृती प्रकाशनाच्या संचालक सुनिताराजे पवार यांनी केले, तर
लेखक वि.दा.पिंगळे यांनी पुस्तक लेखनामागील भूमिका विशद केली. यावेळी फ्रिक्शन वेल्डींग टेक्नॉलॉजी प्रा.लि. पुणेचे संस्थापक-संचालक यतीन तांबे आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल कुदळे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संजय ऐलवाड यांनी केले, तर स्वाती पिंगळे यांनी आभार मानले.

छायाचित्र ओळ
संस्कृती प्रकाशन,पुणेतर्फे प्रकाशित आणि वि.दा. पिंगळे लिखित ‘युगप्रवर्तक महात्मा जोतिबा फुले’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे. यावेळी (डावीकडून) सुनीताराजे पवार, राहूल कुदळे, प्रा.मिलिंद जोशी, लेखक वि .दा . पिंगळे, शोभणे, यतीन तांबे आणि स्वाती पिंगळे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!