भाजपची उज्ज्वल निकम यांना उमेदवारी


उत्तर मध्य मुंबईतुन पूनम महाजन यांचा पत्ता कट
मुंबई
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करत यावेळी भाजपने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे.भाजपने शनिवारी जारी केलेल्या आपल्या 15 व्या यादीत या मतदार संघाची उमेदवारी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना देण्याची घोषणा केली. निकम यांचा सामना महाविकास आघाडी काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्याशी होणार आहे.

उज्ज्वल निकम हे देशातील सर्वात प्रसिद्ध सरकारी वकिलांपैकी एक आहेत. त्यांनी मुंबईवर 26/11 चा अतिरेकी हल्ला करणाऱ्या अजमल कसाबसह, 1993 चे साखळी बॉम्बस्फोट, गुलशन कुमार हत्याकांडा व प्रमोद महाजन हत्याकांडासारखे अनेक हायप्रोफाईल खटल्यांत सरकारतर्फे यशस्वी युक्तिवाद केला आहे. त्यांनी भाजपने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

Advertisement

पूनम महाजन या भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत. प्रमोद महाजन यांची 2006 मध्ये हत्या झाल्यानंतर त्या भाजपत सक्रीय झाल्या होत्या. 2009 मध्ये त्यांनी घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक लढवली होती. पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2014 च्या मोदी लाटेत त्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर पोहोचल्या होत्या. त्यांनी काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांचा पराभव केला होता.
पूनम महाजन एक प्रशिक्षित पायलटही आहेत. त्यांनी अमेरिकेच्या टेक्सास येथून वैमानिकाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांना सुमारे 300 तासांच्या उड्डाणाचा अनुभव आहे. 2012 मध्ये त्यांनी ब्राइटन स्कूल ऑफ बिझनेस अँड मॅनेजमेंटमधून बी. टेकची पदवी घेतली.

राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार, पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारण्याचे काही कारणे सांगितले जात आहेत. त्यानुसार, पूनम महाजन यांनी आपला जनसंपर्क पूर्णतः बंद केला होता. त्या काही निवडक कार्यक्रमांसाठीच आपल्या कार्यालयाबाहेर पडत होत्या. त्यांनी भाजपचे नेते किंवा कार्यकर्त्यांपासून अंतर राखले होते. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा रोष होता.यापूर्वी ठाकरे कुटुंबांशी संपर्क साधण्यासाठी पूनम महाजन भाजपसाठी महत्त्वाच्या ठरत होत्या. पण आता ठाकरे कुटुंब व भाजपमध्ये वितुष्ट निर्माण झाल्यामुळे त्यांची उपयुक्तता संपुष्टात आली होती, अशी काही कारणे सांगितली जात आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!