अलबत्या गलबत्या आता थ्रीडी चित्रपट
१ मे २०२५ला ‘अलबत्या गलबत्या’ चित्रपट प्रदर्शित होणार
मुंबई
नाटककार रत्नाकर मतकरी यांचं गाजलेलं बालनाट्य अलबत्या गलबत्या’ आता मोठ्या पडद्यावर थ्रीडी चित्रपटाच्या स्वरूपात झळकणार आहे
सत्तरच्या दशकात या बालनाट्याने रंगभूमी गाजवली. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी या नाटकात चिंची चेटकिणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर झी प्रस्तुत आणि चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित ‘अलबत्या गलबत्या’ पुन्हा एकदा रंगभूमीवर आलं. यावेळी चतुरस्र अभिनेते वैभव मांगले चिंची चेटकिणीच्या भूमिकेत झळकले.
आता ‘अलबत्या गलबत्या’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. लवकरच थ्रीडी स्वरुपात रुपेरी पडद्यावर ‘अलबत्या गलबत्या’ पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा वरुण नार्वेकर सांभाळणार असून चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.१ मे २०२५ला ‘अलबत्या गलबत्या’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात चिंची चेटकिणीच्या भूमिकेत दुसरं तिसरं कोणी नसून अभिनेते वैभव मांगलेचं झळकणार आहेत. या चित्रपटाला अत्याधुनिक व्हीएफेक्सची जोड दिली जाणार आहे. थ्रीडी स्वरुपात हा चित्रपट असल्यामुळे बच्चेकंपनीला एक वेगळाच अनुभव घेता येणार आहे.
‘अलबत्या गलबत्या’ या चित्रपटाची निर्मिती ‘एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट’चे संजय छाब्रिया, ‘उदाहरणार्थ निर्मित’चे सुधीर कोलते आणि ‘न्यूक्लिअर अॅरो’चे ओंकार सुषमा माने करत आहेत. ‘भालजी पेंढारकर चित्र’ हे या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत.
