कारमध्ये दोन भावंडांचा मृत्यू


गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय

Advertisement

मुंबई
मुंबईत एका कारमध्ये दोन चिमुकल्या मुलांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. अँटॉप हिल परिसरात हा दुर्दैवी आणि तितकाच धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. मृतांमध्ये एका 7 वर्षांच्या मुलाचा आणि 5 वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा समावेश आहेत.याप्रकरणी अँटॉप हिल पोलीस ठाण्यात यापूर्वी मुले बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. चिमुकल्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे एकच खळबळ माजली असून मृतांच्या कुटुंबियांच्या शोकाला पारावार उरलेला नाही. परिसरात शोकाकुल वातावरण आहे.
पोलिसांच्या सांगण्यानुसार, ७ वर्षांचा मुलगा आणि त्याची ५ वर्षांची बहीण अँटॉप हिल परिसरात आई-वडिलांसह रहात होते. बुधवारी दुपारी ते दोघे एकत्र खेळण्यास बाहेर पडले. मात्र बराच वेळ झाला तरी ते परत न आल्याने कुटुंबियांनी शोध सुरू केला. मुलं कुठेच न सापडल्याने अखेर त्यांच्या आई-वडिलांनी अँटॉप हिल पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत मुल बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेत तपास सुरू केला. त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेतल्यानंतर पोलिसांना एका जुन्या कारमध्ये मुलांचे मृतदेह सापडले. मुले कारमध्ये खेळत असताना त्यातच अडकली आणि गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस स्टेशनमधील अधिकारी त्या बेपत्ता मुलांचा शोध घेत असताना एका महिला अधिकाऱ्याला घराजवळ उभी असलेली भंगारावस्थेतील कार दिसली. मात्र त्या कारचा दरवाजा बंद होता आणि रात्री उशीर झाल्यामुळे, काळोखात आतलं काहीच नीट दिसत नव्हतं. अखेर त्या महिला पोलीस अधिकाऱ्याने मोबाईलच्या फ्लॅश ऑन केला आणि कारच्या काचेच्या खिडकीतून आत पाहिलं. तेव्हा त्यांना दोन्ही मुल कारमध्ये बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. पोलिसांनी त्यांना लगेच बाहेर काढून तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. पण रुग्णालयात उपचार मिळण्यापूर्वीच दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
याप्रकरणी अँटॉप हिल पोलीस तपास करत आहेत. मुलांचे आई-वडील अतिशय शोकाकुल आहेत. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास आमची दोन्ही मुलं घराजवळ खेळत होती. काही वेळाने आम्ही त्यांना दोघांना जेवायला बोलावले, पण त्यांचा काहीच आवाज आला नाही. म्हणून आम्ही बाहेर येऊन शोधले असता, ते कुठेच दिसले नाहीत. मुलं बेपत्ता झाल्याचे पालकांच्या लक्षात आले आणि त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. दुपारच्या सुमारास गायब झालेली मुलं रात्री दहाच्या सुमारास कारमध्ये सापडली खरी, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!