नरेंद्र मोदी,राहुल गांधी यांना नोटीस


निवडणूक आयोगाने घेतली काही वक्तव्यांची दखल

Advertisement

नवी दिल्ली
निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या काही वक्तव्यांची दखल घेतली आहे. यासंबंधी निवडणूक आयोगाने भाजपा आणि काँग्रेसला नोटीस पाठवून उत्तर मागितलं आहे. दोन्ही पक्षांना 29 एप्रिल सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून कथित आचार संहितेचे उल्लंघन झाल्या प्रकरणाची दखल घेतली आहे. भाजपा आणि काँग्रेस दोघांनी परस्परांवर धर्म, जाती, समुदाय, भाषा या आधारावर द्वेष आणि विभाजन निर्माण केल्याचा आरोप केला होता.
राजकीय पक्षांना आपले उमेदवार, स्टार प्रचारकांच्या वर्तनाची प्राथमिक जबाबदारी घ्यावी लागेल असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. उच्च पदावरील व्यक्तींच्या प्रचार भाषणांचे अधिक गंभीर परिणाम होतात. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या बांसवाडा येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना वक्तव्य केलं होतं. जन प्रतिनिधित्व अधिनियम, 1951 नुसार कलम 77 अंतर्गत ‘स्टार प्रचारकाचा’ दर्जा देणे पूर्णपणे राजकीय पक्षांच्या अखत्यारितील विषय आहे, असं नोटीसमध्ये म्हटलं आहे. स्टार प्रचारकांच्या भाषणातून गुणवत्ता वाढीची अपेक्षा असते.
काँग्रेसच सरकार सत्तेवर आल्यास ते देशाची संपत्ती घुसखोर आणि ज्यांना जास्त मुलं आहेत, त्यांच्यामध्ये वाटू शकतात. पीएम मोदींच्या या वक्तव्यावर काँग्रेस आक्रमक झाली. पंतप्रधान हिंदू-मुस्लिम करतायत असा आरोप काँग्रेसने केला. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांकडून उत्तर मागितलं आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पीएम मोदी यांच्यावर तर, बीजेपी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर आचार संहिता उल्लंघनाचा आरोप केला होता.
राहुल गांधी त्यांच्यासभेत ज्या भाषेचा, शब्दांचा वापर करतात, त्यावरुन भाजपाने राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली होती. राहुल गांधी यांनी तामिळनाडूत भाषेच्या आधारावर लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भाजपाने केला होता. राहुल गांधी आपल्या भाषणात भाषेच्या आधारावर उत्तर आणि दक्षिण भारतात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात असा आरोप भाजपा नेत्यांनी केला होता. लिखित तक्रारीत भाजपाने राहुल गांधी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!