उद्योगविश्वात डॉ. अजिंक्य सगरे यांची यशस्वी भरारी
मराठा उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित,यशोदाच्या शिरपेचात मानाचा तुरा,
सातारा :
शिक्षण क्षेत्राबरोबरच उद्योगविश्वातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे यशोदा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य सगरे यांनी आपल्या उल्लेखनीय कार्यातून यशोदा शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. उद्योग क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल त्यांना प्रतिष्ठेच्या मराठा उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्राध्यापिका सौ. नम्रता अजिंक्य सगरे या देखील पुरस्कार स्वीकारताना उपस्थित होत्या. त्यांच्या या यशामुळे सातारा जिल्ह्याच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला गेला असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी बीविजी ग्रुपचे हनुमंतराव गायकवाड, श्री संजय वायाळ उपस्थित होते
प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूल संधी निर्माण करण्याची जिद्द, ध्येयाप्रती असलेली निष्ठा आणि कठोर परिश्रमांची तयारी असेल, तर अशक्य वाटणारे उद्दिष्टही साध्य करता येते, हे डॉ. अजिंक्य सगरे यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. नवतरुणाईने केवळ नोकरीच्या संधींच्या मागे न धावता उद्योग आणि उद्योजकतेच्या क्षेत्रातही पुढाकार घ्यावा, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. स्वतः यशस्वी उद्योजक म्हणून कार्य करताना इतरांनाही उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, रोजगारनिर्मितीला चालना मिळावी आणि तरुणांमध्ये व्यावसायिक कौशल्ये विकसित व्हावीत, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
साताऱ्यात शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असताना विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिक शिक्षण मिळावे, हा डॉ. सगरे यांचा ध्यास आहे. बदलत्या औद्योगिक आणि तंत्रज्ञानविषयक गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यविकास, उद्योजकीय दृष्टिकोन आणि रोजगारक्षमता निर्माण करण्यावर त्यांचा भर आहे. उद्योगविश्व आणि शिक्षणसंस्था यांच्यातील समन्वय वाढवून तरुणांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या वाटा खुल्या करण्याच्या दृष्टीने ते पुढाकार घेत आहेत.
यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे यांच्या मार्गदर्शनातून आणि संस्कारांतून प्रेरणा घेत डॉ. अजिंक्य सगरे यांनी शिक्षणासोबत उद्योग क्षेत्रातही स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. समाजाच्या आर्थिक विकासासाठी उद्योजकता महत्त्वाची असून, उद्योगांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती आणि राष्ट्राची प्रगती साधता येते, या विचारातून त्यांचे कार्य सुरू आहे.
मराठा उद्योगरत्न पुरस्काराच्या रूपाने त्यांच्या औद्योगिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेण्यात आली आहे. हा सन्मान म्हणजे त्यांच्या मेहनतीची, दूरदृष्टीची आणि उद्योजकीय वाटचालीची पावती मानली जात आहे. डॉ. अजिंक्य सगरे यांचे यश नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ आणि नागरिकांकडून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
फोटो: मोशी पुणे येथे ग्लोबल मराठा बिझनेस एक्सपोमध्ये डॉ. अजिंक्य सगरे यांना उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते मराठा उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

