विधानसभेला आवाज काढायचा नाही
काँग्रेसच्या सांगलीतील मेळाव्यात विश्वजीत कदम यांचा आवाज
सांगली :
सांगलीतला आमचा तोंडचा घास हिसकावून घेतला. मित्रपक्षाला सांगा, 100 टक्के काँग्रेसची मते मिळणार आहेत, पण पुढे विधानसभेला आवाज काढायाचा नाही. यापुढे मी होऊ देणार नाही. सांगलीत मविआच्या उमेदवारला मतदान होईल, पण पुन्हा मित्रपक्षांना समजावून सांगा, विधानसभेला पुन्हा हा वाद होणार नाही याची काळीज घ्या. याचा वचपा नक्की विधानसभामध्ये काढू, असं काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी म्हटले आहे
महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेच्या जागेचा तिढा सुटला असताना, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी पुन्हा एकदा खदखद बोलून दाखवली. काँग्रेसच्या सांगलीतील मेळाव्यात विश्वजीत कदम यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर आपली नाराजी बोलून दाखवली. सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला देणं चुकीचंच आहे, मी इथे काँग्रेस नेत्यांना उघडं पाडण्यासाठी सांगलीत बोलावलं नाही. पण हे सगळे होत असताना कोण काय करत होते हा माझा सवाल आहे, असं विश्वजीत कदम म्हणाले.
सांगली जिल्ह्याचा इतिहास सर्वांना माहीत आहे. काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यच्या विचारला बळ दिलेय. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी काँग्रेसचा विचार लक्षात घेऊन लढ्यात सहभागी झाले. राजारामबापूंचे देखील जिल्ह्याच्या विकासात योगदान आहे असं म्हणत, राजारामबापू पाटील यांचा विश्वजित कदम यांच्याकडून आवर्जून उल्लेख करण्यात आला.
सांगली जिल्ह्यातील दुष्काळ हटवण्यासाठी सर्व पक्षातील नेत्यांनी काम केले. आज अनेक दुष्काळ भागात सुबत्ता येऊ लागली आहे. गेल्या 5 वर्षात काँग्रेस कार्यकर्त्यांवर मोठे आघात झाले. ज्येष्ठ मंडळी निघून गेले, त्यामुळे तरुण पिढीवर पक्षाची जिल्ह्यातील जबाबदारी आली. अनेक आक्रमणे आमच्यावर झाली पण काँग्रेस कार्यकर्त्यांमुळे आम्ही टिकून राहिलो. जिल्ह्यात 200 किलोमीटर आम्ही जनसंवाद पदयात्रा काढली. काँगेसची जागा ही काँग्रेसला मिळाली पाहिजे हा आग्रह होता. आमच्यात गटबाजी होती, पण यावेळी आम्ही गटबाजीला पूर्णविराम दिला. एकच काँगेस पक्ष हा एकच गट आहे, असं विश्वजीत कदम यांनी सांगितलं.
जिल्ह्यात एकसंघ काँग्रेस ठेवली, पण 3 महिन्यात खूप काही घडले. सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील असे सांगितले आणि आम्ही लोकांना सांगत गेलो की यंदा काँग्रेसचा खासदार असेल. पण जागा वाटप चर्चा सुरू झाल्यावर सांगली आणि कोल्हापूरचा संबंध कुठे आला? शाहू महाराज ज्या पक्षाकडून लढतील त्यावर ते लढतील, असे ठरले होते, सांगलीवर कसा काय हक्क सांगितला? उद्धव ठाकरे आले आणि चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली, हे असे चालते का? असा सवाल विश्वजीत कदम यांनी विचारला.
