चिन्मय-नेहा मांडलेकर ट्रोल


मुलाचे नाव जहांगीर ठेवल्यावरुन गलिच्छ टीका

मुंबई
हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि त्याची पत्नी नेहा मांडलेकर यांना त्यांच्या मुलाच्या नावावरून ट्रोल करण्यात आल्यानंतर चिन्मय यांच्या पत्नी नेहा यांनी एक व्हीडिओ बनवून आपली बाजू मांडली आहे.जहांगीर असे या मुलाचे नाव आहे

Advertisement

मांडलेकर दाम्पत्याला ट्रोल करताना काही जणांनी द्वेष पसरवणारे कमेंट्सदेखील केले आहेत.”तुम्ही हिंदू असूनही मुस्लीम नाव कसं ठेवलं?”, “हेच नाव ठेवायचं असेल तर तुम्ही अफगाणिस्तान, पाकिस्तानात निघून जा,” या आणि अशा हजारो कमेंट्स आणि प्रश्नांनी या दोघांना वेढलं आहे.जहांगीर या शब्दाचा अर्थ ‘जगज्जेता’ असा होतो त्यामुळे एखाद्या दाम्पत्याला त्यांच्या मुलाचं नाव जहांगीर असं ठेवावं वाटलं तर ते का कुणाला चुकीचं वाटावं? असा प्रश्न नेहा मांडलेकरने सोशल मीडियावर विचारला आहे.
चिन्मय मांडलेकर यांना त्यांच्या मुलाच्या नावावरून ट्रोल केलं जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी दोन वर्षांपूर्वी जहांगीरच्या नावावरून त्यांच्यावर काही नेटकऱ्यांनी टीका केली होती. त्यावेळी नेहा मांडलेकर यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून या टीकाकारांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता.आताही त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून जहांगीरचं नाव जहांगीर का ठेवलं याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मुळात स्वतःच्या मुलाच्या नावाचं स्पष्टीकरण जगाला द्यावं लागणं, ते देत असताना स्वतःचा धर्म, जात पुन्हा पुन्हा सांगावी लागणं हा प्रकार दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
माझ्या मुलाचं नाव जहांगीर आहे, जहांगीर हे एक पर्शियन नाव आहे. माझ्या मुलाचा जन्म 21 मार्च 2013ला झाला. 21 मार्चला जमशेदी नवरोज होता. आणि त्यादिवशी तो जन्मला म्हणून त्याचं नाव जहांगीर. आता हे नाव कुणावरून ठेवलं कसं ठेवलं हा मुद्दा नंतर येतो पण या नावाचा अर्थ खूप सुंदर आहे. जहांगीर म्हणजे जगज्जेता. जग जिंकलेला जहांगीर म्हणून हे नाव असं ठेवलं.मला माहित नाही इतर लोक त्यांच्या मुलांची नावं कशी ठेवतात पण मी तरी माझ्या दोन्ही मुलांची नावं ही त्या नावांचा अर्थ फार गोड आहे म्हणून ठेवलेली आहेत. एवढंच काय तर भारतरत्न जेआरडी टाटा यांचं नावही जहांगीरच आहे. टाटा कुटुंब हे माझ्या आणि माझ्या नवऱ्यासाठी प्रेरणादायी आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलताना वकील असीम सरोदे म्हणाले की, “एकीकडे आपण विश्वगुरू होण्याच्या, विश्व नागरिक होण्याच्या गप्पा मारतो, आता विश्वात्मके देवो असंही आपण म्हणतो पण आपण मुळीच वैश्विक वगैरे काही नाहीओत. आपण अत्यंत गावठी आणि मागास विचारांचे लोक आहोत हेच या ट्रोलिंगवरून दिसतं.त्यामुळे नावाचे अर्थ आणि त्या अर्थानुसार जगणं हा भाग दूरच राहतो आणि त्या नावाला ते मुस्लिम नाव आहे, ते ख्रिश्चन नाव आहे असं करून आपण प्रत्येक नावाला धर्मांमध्ये विभागून दिलेलं आहे.त्याचा त्रास मलाही झाला. खरंतर संस्कृतमध्ये असीम हा शब्द वापरला जातो, हिंदीतही ‘भगवान की असीम कृपा होगी’ असं म्हणतात पण याची काहीही कल्पना नसलेल्या लोकांना असं वाटतं की असीम हे नाव मुस्लिमच आहे. त्यामुळे मग त्या नावाच्या माणसाचा द्वेष करणं, त्याला तुझ्या आईचे कुणासोबत काही संबंध होते का असं विचारणं, त्याच्या कुटुंबीयांना त्रास देणं असे प्रकार केले जातात.”


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!