मनसे-भाजप युती होणार का ?
पाडव्याच्या जाहीर सभेत राज ठाकरे काय बोलणार ?
मुंबई
राज ठाकरे यांच्या मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेची भूमिका काय असणार, मनसे महायुतीत सामील होणार का याबाबत राज ठाकरे या मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरवर्षीप्रमाणे शिवतीर्थावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर होणारा हा गुढीपाडवा खास आहे. कारण या मेळाव्याआधी पडद्याआड बरंच काही राजकारण घडलं राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. मनसे महायुतीत सामील होणार, असं बोललं जात होतं. मात्र या भेटीगाठींना दोन आठवडे उलटले तरी पुढे काहीच घडलं नाही.अचानक सा-या चर्चा बंद झाल्या. बंद दारा-आड नेमकी काय चर्चा झाली, काय वचनं दिली गेली. याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे आणि नेमका हाच धागा राज ठाकरेंनी पकडला आहे. नक्की काय घडतंय, काय घडलंय हे सांगण्याची वेळ आलीय म्हणत राज ठाकरेंनी मोठी भूमिका जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. मनसे महायुतीत सामील झाली तर त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर देखील याचा परिणाम होणार आहे.
राज ठाकरेंच्या रुपानं चौथा भिडू महायुतीत आल्यास लोकसभा निवडणुकीची गणितं बदलू शकतात. मनसे सोबत आल्यास मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर याठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना फायदा होऊ शकतो, असा अंदाज आहे. लोकसभेसह विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत मनसेमुळे महायुती बळकट होईल. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेची भूमिका काय असेल, अमित शाहांसोबतच्या बंद दाराआड चर्चेत नेमकं काय घडलं, मनसे महायुतीसोबत जाणार..स्वबळावर लढणार की निवडणुकीपासून अलिप्त राहणार. अशा चर्चा होताना दिसतायत. या सा-या चर्चांची उत्तरं गुढीपाडव्याच्या सभेत मिळतील हे निश्चित.

