स्वरांच्या श्रवणातून संगीताची जाण वाढते : शिरीष चिटणीस


स्वस्ति श्री’ मराठी-हिंदी गीतांचा स्वरोत्सव उत्साहात

सातारा,
‘मराठी संगीत नाटकाने’जगाला मोठी देणगी दिली असून, नाट्यसंगीताचे सातत्याने श्रवण केल्याने श्रोत्यांना हळूहळू विविध रागांची ओळख होऊ लागते आणि संगीताची जाण अधिक समृद्ध होते.कुसुमाग्रज (वि वा शिरवाडकर) यांनी असे म्हंटले आहे कि, ‘मराठी संगीत नाटक हे महाराष्ट्राच्या रंगभूमीचेच नव्हे,तर कलाजीवनाचे खास वैशिष्ट्य आहे,अपूर्व असे ऐश्वर्य आहे.’असे प्रतिपादन दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी केले.

दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा यांच्या वतीने तसेच संगीतकार राजेंद्र रानडे आणि उज्वला करंबेळकर यांच्या वतीने ‘स्वस्ति श्री’ मराठी-हिंदी गाण्यांचा स्वरोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास सुरेखा शेजवळ, राजेंद्र रानडे, डॉ. हेमलता गोखले,प्रज्ञा लाटकर, उज्वला करंबळेकर,संतोष वाघ,गोडसे सर,सुजाता नावंधर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिरीष चिटणीस म्हणाले, ‘‘कराओके हा सध्याच्या काळातील महत्त्वाचा सांस्कृतिक उपक्रम बनला आहे. त्यातून श्रोत्यांची सांस्कृतिक भूक भागते आणि संगीत ऐकता-ऐकता ते संगीताचे जाणकार व रसिक बनतात. स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने दीपलक्ष्मीचे सभागृह कलाकारांना विनामूल्य उपलब्ध करून दिले जाते.’’
शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये संगीत व चित्रकलेची आवड निर्माण व्हावी, यासाठी आमच्या ‘लोकमंगल ग्रुप’ शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये या विषयांचे शिक्षण तसेच परीक्षांचे आयोजन केले जाते, असेही त्यांनी सांगितले. कलाकारांनी वाचनाची सवय जोपासली पाहिजे. वाचनामुळे गीतातील शब्दांचा अर्थ, भाव आणि मर्म समजून घेण्यास मदत होते. यासाठी त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या संघर्षाचा तसेच कवयित्री शांता शेळके यांनी अण्णाभाऊ साठे यांची ‘फकीरा’ कादंबरी उशिरा वाचल्याबद्दल केलेल्या आत्मपरीक्षणाचा संदर्भ दिला.

सुरेखा शेजवळ यांनी संगीताचे मानवी जीवनातील महत्त्व विशद केले. ‘‘मानवी आयुष्य संगीताने व्यापलेले आहे. ६४ कलांच्या मुळाशी संगीत हीच प्रमुख कला आहे. भारतीय संस्कृतीत संगीताला अत्यंत श्रेष्ठ स्थान असून, त्याचा मूळ पाया सामवेदात आढळतो. पाण्याचा प्रवाह, वाऱ्याची झुळूक, पानांची सळसळ अशा निसर्गातील प्रत्येक घटनेत लय आणि संगीत सामावलेले आहे. संगीताच्या श्रवणाने मन एकाग्र होते,’’ असे त्यांनी सांगितले. शिरीष चिटणीस यांचे सभागृह साताऱ्यातील ६४ कलांचे माहेरघर बनले असून, विविध कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे कार्य तेथून होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Advertisement

प्रज्ञा लाटकर यांनी संगीताच्या विकासाचा प्रवास उलगडून सांगितला. आदिमानवाच्या अनुभवातून आवाजाची निर्मिती आणि निसर्गातील विविध घटनांमधून, तसेच प्राण्यांच्या कातड्यावर आघात होऊन वाद्यांची निर्मिती कशी झाली, याविषयी त्यांनी माहिती दिली. माणसाच्या बोलण्यात आणि चालण्यातही विशिष्ट लय असते. ही लय मानवी शरीरातच वसलेली आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली काही निवडक गाणी तसेच अन्य रचना सादर करण्यात आल्या.

राजेंद्र रानडे यांनी आपल्या संगीतप्रवासातील अनुभव कथन केला. अशोक पत्की,बाळ कोल्हटकर, के. सिकंदर यांसारख्या दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळाली असून, ट्रिनिटी लंडनच्या परीक्षा, १४ वर्षांचे अध्यापन आणि ५७ संगीत कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या कविता व गझलांना लावलेल्या चाली तसेच त्यांच्या नम्र स्वभावाचे शांता शेळके यांनी केलेले कौतुक त्यांनी आठवले. गीतकार आणि संगीतकार यांच्या चालींकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. त्यामुळे आव्हानात्मक आणि वेगळ्या धाटणीच्या चाली तयार करण्यावर आपला नेहमी भर राहिला असल्याचे रानडे यांनी सांगितले.

उज्वला करंबेळकर यांनी ‘स्वस्ति’ म्हणजे शुभ आणि ‘श्री’ म्हणजे देवत्व, असा अर्थ सांगत शुभ शकुनाच्या नावाने मराठी-हिंदी गीतांच्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. संगीत अलंकार प्राप्त प्रज्ञा लाटकर यांच्यासह विविध तज्ज्ञ कलाकारांना एकत्र आणून हा संगीतमय समूह स्थापन करण्यात आला आहे. शिरीष चिटणीस यांनी विनामूल्य सभागृह उपलब्ध करून दिल्यामुळेच हा कार्यक्रम साकार होऊ शकला, असे सांगून त्यांनी त्यांचे आभार मानले.

कार्यक्रमात प्रज्ञा लाटकर, उज्वला करंबेळकर, सुजाता नावंधर, संतोष वाघ, गोडसे सर यांनी विविध मराठी व हिंदी गीतांची सुरेल मैफल सादर केली. उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत कार्यक्रमाचा आनंद घेतला. या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्रुती कन्नूर यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!