समता आणू समरसतेतून:डॉक्टर रमेश पांडव


सातारा येथे बंधुता परिषद उत्साहात संपन्न
सातारा
आम्ही समरसतेतून समता आणू आणि भारत मातेला मातृ स्थानी मानणारा समाज निर्माण करू असे उद्गार समरसता गतिविधि चे केंद्रीय मंडळ सदस्य डॉक्टर रमेश पांडव यांनी काढले.सातारा येथे बंधुता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून ते उपस्थितांशी संवाद साधत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी सातारचे नूतन नगराध्यक्ष अमोल मोहिते होते.
2 जानेवारी 1940 रोजी कराड येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भवानी शाखेला दिलेली भेट ही केवळ ऐतिहासिक घटना नव्हे, तर भारतीय समाज जीवनाला दिशा देणारा वैचारिक क्षण होता. याच ऐतिहासिक स्मृतीचे औचित्य साधून, या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
रमेश पांडव आपल्या एक तासाच्या भावना पूर्ण आणि अभ्यासपूर्ण भाषणात पुढे म्हणाले की बंधुता परिषद ही केवळ कार्यक्रम नसून, समाज प्रबोधनाची चळवळ आहे. परस्पर संवाद, समरसता, सामाजिक सौहार्द आणि राष्ट्रनिष्ठा या मूल्यांची पुनर्स्थापना करण्याचे कार्य ही परिषद करते. विविध विचारधारांचे लोक एका व्यासपीठावर येऊन समाज हिताचा विचार करतात हेच या परिषदेचे खरे महत्त्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खरंच शाखेला भेट दिली का नाही, याचा पुरावा शोधण्याची गरज नाही. अनेक ग्रंथात त्यांनी हिंदू संघटनेचे महत्त्व समजावून सांगितले आहे. याच्या समर्थनार्थ अनेक पुस्तकांची नावे पृष्टासह श्री पांडव यांनी सांगीतली. आजच्या काळात, जिथे समाजात ताणतणाव व विभाजनाची बीजे दिसतात, तिथे बंधुता परिषद एकत्र येण्याचा, एकमेकांना समजून घेण्याचा आणि पुढे जाण्याचा मार्ग दाखवते.
त्यांनी भाषणाच्या अखेरीस सर्वांनी एकत्र येऊन जुन्या अप्रिय गोष्टींना तिलांजली द्यावी असे आवाहन केले.सध्याच्या काळात नोकऱ्यांची संख्या मर्यादित असताना स्वरोजगार हेच त्यावरचे उत्तर ठरेल असे ते म्हणाले.समरसता मंचाने स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे असे त्यांनी मनोगताच्या अखेरीस सांगितले.
पश्चिम महाराष्ट्र समरसता गती विधीचे सहसंयोजक मुकुंदराव आफळे यांनी प्रास्ताविक केले.
पश्चिम महाराष्ट्र चर्मकार समाजाचे अध्यक्ष श्री सतीश राव रावखंडे यांनी आपल्या मनोगतात या उपक्रमाचे स्वागत केले आणि भावी काळात या उपक्रमास सर्व सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.दलित महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष उमेश खंडूजोडे यांनी आपल्या मनोगतात समरसता मंचाची सर्व मंडळी आपली मित्र असल्याचे सांगितले.हळूहळू संघाबद्दलचे गैरसमज दूर होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असे ते मोकळेपणाने म्हणाले.
सातारा नगरपरिषदेचे नूतन नगरसेवक एडवोकेट दत्तात्रेय बनकर यांनी असे कार्यक्रम शासकीय पातळीवर होण्याची आवश्यकता प्रतिपादन केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल विनाकारण गैरसमज पसरवले गेले हे खेदजनक असून, आता मात्र सहमतीचे नवे युग सुरू झाले आहे याचा त्यांनी आनंद व्यक्त केला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी या परिषदेस शुभेच्छा व्यक्त करताना, गैरसमज दूर होण्यास प्रारंभ झाला आहे असे सांगितले.
या कार्यक्रमास सातारा नगरपरिषदेचे नूतन नगरसेविका सौ विमल गोसावी, सौ अर्चना कांबळे, नूतन नगरसेवक राजू गोरे, अक्षय जाधव,विश्वतेज बालुगडे त्याचप्रमाणे उद्योजक बाळासाहेब खरात, दत्ताजीराव थोरात हे उपस्थित होते. खेड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आप्पा माने तसेच माजी उपसरपंच कांतीलाल कांबळे, कामेश कांबळे,अमित भिसे,राजू जेधे, बाळासाहेब गोसावी हे सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांसह परिषदेत उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सातारा जिल्हा कार्यवाह महेश शिवदे हे सुद्धा बैठकीस उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समरसता गतिविधिचे जिल्हा संयोजक श्री जयंत देशपांडे यांनी केले तर बंधुता परिषद चे सहसंयोजक ॲड प्रणित ससाणे यांनी आभार प्रदर्शन केले.
शेवटी सामूहिक पसायदानाने या परिषदेची सांगता झाली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!