संगीतप्रेमी ग्रुपचा २१ वा कार्यक्रम उत्साहात


दीपलक्ष्मी पतसंस्था व संगीतप्रेमींच्या संयुक्त विद्यमाने सुरेल मैफिल
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा व संगीतप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘संगीतप्रेमी गाण्यांची सुरेल मैफिल’ हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी दैनिक ‘तरुण भारत’च्या सातारा आवृत्तीच्या प्रमुख प्रगती पाटील,शिरीष चिटणीस, डॉ. सारिका देशपांडे,गीता पाटील,विनय कुलकर्णी, प्रमोद लोंढे, राजेंद्र पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .संगीतप्रेमी ग्रुपचा हा २१ वा कार्यक्रम होता.
यावेळी दीपलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिरीष चिटणीस म्हणाले, “वेगवेगळ्या पुस्तकांवर चर्चा, संमेलने तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी दीपलक्ष्मी पतसंस्थेचा हॉल मोफत उपलब्ध करून दिला जातो. पुस्तक प्रकाशनासाठी पुण्यासह विविध ठिकाणांहून मंडळी येथे येतात. कराओकेचे कार्यक्रम अमेरिका, चीनसह विविध देशांत लोकप्रिय होत आहेत. अशा कार्यक्रमांमधून रसिकांना आनंद मिळतो.”
डॉ. सारिका देशपांडे म्हणाल्या, “गाणी मुळात ऐकावीशी वाटणे आणि ती मनापासून एन्जॉय करणे हीच खूप मोठी गोष्ट आहे. गाण्यांचा आस्वाद घेता येणे हेही महत्त्वाचे आहे. आपले मन प्रसन्न असले की अनेक गोष्टी सुरळीत होत जातात. माझ्यासाठी गाणी ऐकणे हे श्वास घेण्याइतके महत्त्वाचे आहे. गाण्यामुळे एखाद्या तणावातून मी पटकन बाहेर येऊ शकते.”
गीता पाटील यांनी साताऱ्याच्या सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रातील परंपरेचा गौरव केला. त्या म्हणाल्या, “सातारा जसा कंदी पेढ्यासाठी प्रसिद्ध आहे, तसाच तो कलाकारांसाठीही प्रसिद्ध आहे. तुम्ही सर्वजण आपल्या कलेच्या माध्यमातून सातारचे नाव आणखी रोशन करावे. सातारचे नाव परदेशातही पोहोचले आहे. कंदी पेढ्याचे परदेशात कौतुक होते; त्याचप्रमाणे सातारच्या कलाकारांनीही आपल्या कलेचा ठसा देश-विदेशात उमटवावा.”
यानंतर अपर्णा गायकवाड, स्नेहल चिंचणे, विनयकुमार, राजेंद्र पाटील व प्रमोद लोंढे यांनी विविध गाण्यांचे सादरीकरण करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाचे आयोजन संगीतप्रेमी ग्रुपचे संस्थापक प्रमोद लोंढे, राजेंद्र पाटील व विनयकुमार यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!