ज्येष्ठ नागरिकांनी मैत्रभाव जोपासला पाहिजे:प्रा.यशवंत पाटणे


उमेद ज्येष्ठ नागरिक संघाचे शानदार उदघाटन

सातारा

ज्येष्ठ नागरिक ही समाजातील चालती बोलती संस्कारपीठे असतात. त्यांच्या अनुभवातून उमलत्या पिढ्यांचे आयुष्य संपन्न होत असते. सध्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे अवघे विश्व घरात आले आहे. अतिरेकी चंगळवादाने तरुणाई भरकटली आहे. घराघरातले संवाद तुटत चालले आहेत. जेष्ठ मंडळींना एकटेपणाची शिक्षा भोगावी लागत आहे. अशा काळात ज्येष्ठ नागरिकांनी आपली उमेद वाढवण्यासाठी मैत्रभाव जोपासला पाहिजे,असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक,विचारवंत,
व्याख्याते प्रा.डॉ.यशवंत पाटणे यांनी केले.
समाजातील विविध क्षेत्रातील प्रमुख लोकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या उमेद या ज्येष्ठ नागरिक संघाच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये प्राचार्य यशवंत पाटणे बोलत होते. व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष अशोक कानेटकर, फेसकॉम या राजस्तरीय संघटनेच्या संचालिका व महिला प्रतिनिधी सुजाता कानिटकर, संघाचे उपाध्यक्ष गोपाळराव खजुरे, कार्याध्यक्ष दिलीपराव चरेगावकर,सचिव विजय फडणीस, सदस्य डॉक्टर अरविंद काळे उपस्थित होते.
डॉ पाटणे म्हणाले.मानवी जीवन महासागरासारखे असते.त्यात मोहाच्या मगरी, दुःखाच्या मासोळ्या आणि संकटाचे खडक असतात, पण तिथल्या शिंपल्यात विचारांचे माणिक लपलेले मोती असतात. ते घेऊन जीवन आनंदी करायचे असते.त्यासाठी उत्तम सवयी, नियमित व्यायाम, सकारात्मक दृष्टिकोन, परस्पर स्नेहभाव आणि तणावमुक्तीसाठी छंद यांची जोपासना केली पाहिजे.
डॉक्टर पाटणे पुढे म्हणाले चैतन्याला कधीच वयाचे बंधन नसते, पण हे चैतन्य समोर येण्यासाठी मन घुसळावे लागते. वृद्धत्व हा आजार नाही तर तो आधार असतो हे समाजालाही सांगण्याची गरज आहे. वृद्धत्व आणि ज्येष्ठत्व हा एक आशीर्वाद असतो. आपल्या संस्कृतीनेच आपल्याला माता-पिता आणि गुरुमध्ये देवत्व पाहायला शिकवले आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये अशा प्रकारचे देवत्व असते त्यांचा आशीर्वाद महत्त्वाचा असतो.
सध्या सर्वत्र सर्वांना प्रचंडपणाचे वेड लागले आहे. त्यामुळे साधेपणातील आनंद हरपत चालला आहे. उमेद जेष्ठ नागरिक संघाच्या निमित्ताने या साधेपणातील आनंदाचा शोध सातत्याने घेतला जाईल अशी अपेक्षाही यावेळी डॉक्टर यशवंत पाटणे यांनी व्यक्त केली .

Advertisement

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर साने गुरुजींनी यांनी लिहिलेली खरा तो एकची धर्म ही सामुदायिक प्रार्थना करण्यात आली. प्रास्ताविकामध्ये कार्याध्यक्ष दिलीप चरेगावकर यांनी हा संघ स्थापन करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर सचिव विजयकुमार फडणीस यांनी सर्व कार्यकारणी सदस्यांचा परिचय करून दिला.
या संघाचे उद्घाटनादिवशी प्राचार्य यशवंत पाटणे यांचाही वाढदिवस होता. त्यांचा वाढदिवस उमेद संघातर्फे साजरा करण्यात आला. याचवेळी संघाचे सदस्य दत्तात्रय इंगवले, जगन्नाथ भोसले, अशोक थोरात, सुधाकर कुलकर्णी, गोपाळराव खजुरे या सर्वांचे वाढदिवसही केक कापून आणि रोप देऊन साजरा करण्यात आला. दत्तात्रय इंगवले यांनी ही रोपे खास उपलब्ध करून दिली.अशोक थोरात यांनी वाढदिवस साजरा केल्याबद्दल आभार व्यक्त केले.विश्वास लिमये ह्यांनी ज्यांचे वाढदिवस होते त्या सदस्यांची ओळख करून दिली
डॉ अरविंद काळे ह्यांनी आपल्या भाषणात बचतीचे महत्वाचं विशद करून धन्वंतरी पतसंस्थेची माहिती दिली.
सुजाता कानेटकर यांनी आपल्या भाषणामध्ये फेस्कॉम संघटनेच्या कार्याची माहिती देऊन उमेद संघाकडून फेस्कॉमला खूप अपेक्षा असल्यास स्पष्ट केले.
अध्यक्ष अशोक कानेटकर यांनी उमेद संघ नेहमीच उमेदीने आणि सातत्याने काम करेल अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संपादक मुकुंद फडके यांनी केले. आभार प्रदर्शन लक्ष्मीकांत वाळिंबे यांनी केले.
कार्यक्रमाला ज्येष्ठ रंगकर्मी रघुवीर आपटे,ज्येष्ठ पत्रकार शरद महाजनी,उमेद ज्येष्ठ नागरिक संघाचे दिलीप गरुड. प्राध्यापक प्रकाश सुतार. गजानन घाडगे,प्रकाश येळगावकर ,दत्तात्रय देगावकर, विश्वास लिमये,जनार्दन गायकवाड इतर सर्व कार्यकारणी सदस्य आणि सदस्य उपस्थित होते.
याशिवाय फेस्कॉम या राज्यस्तरीय संघटनेच्या समन्वय समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव पिसाळ, सचिव डॉक्टर वैशाली भोसेकर, महिला सदस्य ज्योती मोहिते, सदस्य विठ्ठलराव जाधव आणि कोषाध्यक्ष मदनलाल देवी उपस्थित होते.
पसायदान गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!