वसंत व्याख्यानमालेत संगीताची मेजवानी
संगीतकार बप्पी लहरी स्पेशल हिंदी गाण्यांचा कार्यक्रम
सातारा
ज्ञानविकास मंडळाच्या वतीने चालू असलेल्या वसंत व्याख्यानमालेच्या 51 व्या वर्षातील तिसरे पुष्प गायक कलाकार सुनील कारंजकर, ज्योत्स्ना खुटाळे आणि विजया चव्हाण यांनी गुंफले संगीतकार बप्पी लहरी स्पेशल हिंदी गाण्यांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात या गायक कलाकारांनी बप्पी लहरी यांनी संगीतबद्ध केलेली सुरेल गाणी गायली.
कार्यक्रमाची सुरुवात बप्पी लहरी यांच्या जिंगल जिंगल या बाल गीताने झाली. या कार्यक्रमात यानंतर 90 च्या दशकातील जितेंद्र आणि श्रीदेवी यांचेवर चित्रीत झालेलं आणि तुफान गाजलेलं नैनो मे सपना, अलबेला मौसम केहता है स्वागतम, नमक हलाल चित्रपटातील रात बाकी बात बाकी, जवानी जानेमन अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांच्यावर चित्रीत झालेले आज रपट जाये तो, शराबी चित्रपटातील इंतहा हो गई इंतजार की, नमक हलाल चित्रपटातील पग घुंगरू बांध मीरा नाची थी अशा प्रकारची वेगवेगळ्या वाद्यांचा वापर करून संगीतबद्ध केलेली बप्पीदांची गाणी गायली. मंजिले अपनी जगह या गझलला सुद्धा कार्यक्रमात विशेष दाद मिळाली. त्याचबरोबर मुझे नौलखा मंगा दे , रात बाकी अशा गाण्यांना श्रोत्यांकडून विशेष दाद मिळाली. या कार्यक्रमाचे बहारदार असे निवेदन निवेदिका सविता कारंजकर यांनी केले. ही सर्वच गाणी रसिका श्रोत्यांना 90 च्या दशकात घेऊन गेली. कार्यक्रमाची सांगता बप्पीदांच्या लोकप्रिय ठरलेल्या चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना या गाण्याने झाली. एकंदरीत या संगीतमय कार्यक्रमाची मनामध्ये रुंजी घालतच सातारकर श्रोते घरी परतले. याप्रसंगी गौतम भोसले यांनी श्रोत्यांचे स्वागत केले. अरुण राजहंस यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार झाला.
