हरवलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा शोध


वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेची २४ तासांत कामगिरी

सातारा
वाई पोलीस ठाण्यात तीन अल्पवयीन मुलांना पळवून नेल्याची नोंद झाल्यानंतर वाई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या २४ तासांत तिन्ही मुलांचा शोध घेऊन त्यांना सुखरूप पालकांच्या ताब्यात दिले. या जलद कारवाईबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ ऑगस्ट रोजी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २१४/२०२६ अन्वये बीएनएसएस कलम १३७ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाशी बैठक घेऊन शोधमोहीम सुरू केली.
शोधकार्यासाठी तीन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. एक पथक वाई शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी, दुसरे मांढरदेवी परिसरात तर तिसरे पाचगणीच्या दिशेने रवाना करण्यात आले. तपासादरम्यान चांदणी चौक (एमआयडीसी) येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिन्ही मुले रस्त्यावरून जाताना दिसून आली. ही माहिती मिळताच सर्व पथके बोपर्डी परिसरात एकत्र करण्यात आली.

Advertisement

यानंतर बोपर्डी, धावडी, लोहारे, सुलतानपूर आणि शेलारवाडी परिसरात मुलांचे फोटो दाखवून नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली. दरम्यान, आयटीआय कॉलेज परिसरातील डोंगराकडे तीन मुले धावताना दिसल्याने पोलिसांनी परिसराला वेढा घालून पाठलाग केला. अखेर डोंगराच्या पलीकडील रेणुसे वस्ती येथे तिन्ही मुले सुखरूप आढळून आली.
तपासात ही तिन्ही मुले एकमेकांचे मित्र असून सायकलवर फिरत फिरत घरापासून दूर गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचे समुपदेशन करून सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात दिले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रदीप सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे, पोलीस कर्मचारी नितीन कदम, विक्रम धोत्रे, हेमंत शिंदे, विशाल शिंदे, विशाल येवले तसेच होमगार्ड इंद्रजित लाखे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!