साहित्याच्या सहवासातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल -मुकुंद फडके


लोकमंगल हायस्कूलमध्ये साहित्यिक आनंद मेळ्याचे उत्साहात आयोजन .

Advertisement

सातारा :
शालेय जीवनात शिक्षणाबरोबरच वाचनाची आवड जोपासणे अत्यंत आवश्यक असून शिक्षण आणि वाचन या दोन प्रभावी माध्यमांतून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य घडविता येते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक मुकुंद फडके यांनी केले.
येथील लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था, आदिश जैन फाउंडेशन आणि अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमंगल हायस्कूल, एम.आय.डी.सी, कोडोली येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘साहित्यिक आनंद मेळा’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक श्रीराम नानल होते. व्यासपीठावर लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिरीष चिटणीस, मृणाल जैन, शिल्पा चिटणीस, मुख्याध्यापक विजय यादव,प्राथमिकच्या मुख्याध्यापिका ज्योती नलवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मुकुंद फडके म्हणाले, मराठी बालसाहित्याचा समृद्ध वारसा विद्यार्थ्यांनी जाणून घेणे आवश्यक आहे. आधुनिक पिढीला इंग्रजी साहित्याचे आकर्षण असले तरी हॅरी पॉटरशिवाय फास्टर फेणे, गोट्या आणि चिंगी यांसारख्या मराठी साहित्यकृतींचेही वाचन करणे गरजेचे आहे. शिक्षण आणि वाचनाच्या बळावर समाजातील वंचित घटकांनीही उल्लेखनीय प्रगती साधल्याची अनेक उदाहरणे समाजात आहेत. आयुष्यातील अडचणींवर मात करण्यासाठी चिकित्सक वृत्ती, योग्य शिक्षण आणि दर्जेदार वाचन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम नानल यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांना साहित्यिकांचा प्रत्यक्ष सहवास लाभत असल्याने त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती रुजण्यास मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी लोकमंगल हायस्कूल आदर्शवत कार्य करत असून विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डोळस बनविण्याचे काम शिरीष चिटणीस करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिरीष चिटणीस म्हणाले विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वयातच साहित्यिकांचा सहवास लाभावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मराठी शाळांमधून जे मिळते ते अन्य इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून विद्यार्थ्यांना मिळत नाही .मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी मराठीची गोडी अंगीकारली पाहिजे.
आदिश जैन फाउंडेशनच्या मृणाल जैन यांनी फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध साहित्यिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती देत लोकमंगल हायस्कूलने उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
साहित्यिक आनंद मेळ्याच्या पहिल्या सत्रात डॉ. दिलीप गरुड, आशा ठीपसे, नंदा देवडीकर, शोभना उदगावकर आणि पल्लवी पाठक यांनी कथाकथनातून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. दुसऱ्या सत्रात सुरेश शेठ, अंजली डोळे, नीता तुपारे, सुजाता पवार आणि अंजली महाजन यांनी काव्यवाचन केले. शाळेतील विद्यार्थ्यांनीही यावेळी कविता सादर केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय यादव यांनी केले. त्यांनी विद्यालयाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाब पठाण यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रतिभा वाघमोडे यांनी मानले .कार्यक्रमास उदय जाधव, काकासो निकम, सतीश पवार,भास्कर जाधव ,संगीता कुंभार,वैशाली वाडीले,बाळकृष्ण इंगळे, देवराम राऊत,बाळकृष्ण फडतरे,चंद्रकांत देवगड, उपस्थित होते .
फोटो ओळ : साहित्यिक आनंद मेळ्याच्या उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन करताना ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके. समवेत शिरीष चिटणीस, शिल्पा चिटणीस, डॉ. दिलीप गरुड, श्रीराम नानल, विजय यादव, म. भा. चव्हाण व मृणाल जैन.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!