पुण्यात सलग चौथ्या दिवशी गोळीबार
येरवडा परिसरात पहाटेच्या वेळी गोळीबाराची घटना
पुणे :
पुण्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.पुण्यात सलग चौथ्या दिवशी येरवडा परिसरात पहाटेच्या वेळी गोळीबाराची घटना समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भयंकर भीतीचं वातावरण पसरलं आहे.येरवडा येथील अग्रेसन स्कूल समोर पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान गोळीबाराची घटना घडली. जुन्या वादाचा राग मनात धरून एकावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. आकाश चंदाले याने विकी चंदाले या दोघांवर गोळीबार केला आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दोघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याचं देखील पोलीस तपासात समोर आलं आहे.
सलग चौथ्या दिवशी गोळीबार
पुण्यात याआधी जंगली महाराज रोड, हडपसर, सिंहगड रोडवर गोळीबाराच्या घटना समोर आल्या होत्या. जंगली महाराज रोडवर धीरज दिनेशचंद्र आरगडे बांधकाम व्यावसायिकावर स्विगीचे वस्त्र परिधान करून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. तर हडपसरमधील शेवाळेवाडी येथे ठेकेदारीच्या वादातून दोन सैनिकांमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार झाला. यापूर्वी देखील सतत पुण्यात अशा गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. या घटना लागोपाठ घडत असल्यामुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे
