यशोदा पॉलिटेक्निक सर्वांगीण विकासाची तपोभूमी : डॉ. यशवंत पाटणे


यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा ओरिएंटेशन प्रोग्रॅम उत्साहात संपन्न

सातारा :
यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा येथे प्रथम वर्ष पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी आयोजित इंडक्शन व ओरिएंटेशन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक आणि समाजप्रबोधनकार डॉ. यशवंत पाटणे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना “यशोदा शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांच्या उद्धाराची तपोभूमी असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम आणि सुसंस्कारित नागरिक घडविण्याचे कार्य ही संस्था सातत्याने करत आहे,” असे प्रतिपादन केले. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. दशरथ सगरे हे होते

विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉ. पाटणे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची कदर करणाऱ्या शिक्षण संस्थांतूनच कुशल, सक्षम आणि जबाबदार मनुष्यबळ निर्माण होत असते. बदलत्या काळाची गरज ओळखून शिक्षण संस्थांनी अत्याधुनिक अभ्यासक्रम, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, संशोधनाची संधी आणि प्रभावी प्लेसमेंट सेल यांवर भर दिला पाहिजे. अशा सर्व बाबींची प्रभावी अंमलबजावणी करणारी यशोदा शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करणारी एक आदर्श संस्था असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली.

ते पुढे म्हणाले की, ज्ञानाने संपन्न असलेली पिढी हेच कोणत्याही राष्ट्राचे खरे वैभव असते. गुणवत्तेला जात, धर्म किंवा पंथ यांची बंधने नसतात. मात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता फुलण्यासाठी प्रेरणादायी वातावरण, रोजगाराच्या संधी, आधुनिक सुविधा आणि ध्येयवादी शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आवश्यक असते. शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे माध्यम नसून विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त सामर्थ्याची जाणीव करून देणारी आणि जीवनातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्याची क्षमता विकसित करणारी प्रक्रिया आहे.
विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञानाबरोबरच मूल्यशिक्षण, सामाजिक जाणीव, शिस्त आणि प्रामाणिकपणा यांचाही स्वीकार केला पाहिजे, असे आवाहन करताना त्यांनी सांगितले की, शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट केवळ रोजगार मिळविणे नसून जीवनक्षमतांचा विकास आणि मूल्यसंस्कार घडविणे हे आहे.

Advertisement

गुणवत्ता संपन्न विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला, . गणित तसेच अन्य विषयांमध्ये शंभर टक्के गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक शिक्षण दिले जात नाही, तर त्यांच्यामध्ये उद्योगाभिमुख कौशल्ये, नेतृत्वगुण, मूल्यसंस्कार आणि आत्मविश्वास विकसित करण्यावर विशेष भर दिला जातो. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्याने सातत्याने शिकण्याची वृत्ती जोपासून नव्या संधींचे स्वागत केले पाहिजे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा राष्ट्रनिर्माता आहे आणि त्याच्या सर्वांगीण विकासासाठी यशोदा शिक्षण संस्था सदैव कटिबद्ध आहे.”

डॉ. पाटणे यांच्या प्रेरणादायी विचारांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे नवागत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि भविष्याविषयी नवी उमेद निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. आभार उपाध्यक्ष प्रा. डॉ.अजिंक्य सगरे यांनी मानले, कार्यक्रमाला संस्थेच्या विश्वस्त डॉ.स्वराली सगरे, संजय शेळार, संजय कदम, राजेश वंजारी, प्रकाश निकम, कुमार सोनवणे, निलेश जगदाळे, डॉ. गणेश सुरवसे, डॉ. रणधीरसिंह मोहिते, डॉ. मृणालिनी जाधव, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम धुमाळ आणि विभक्ती गायकवाड यांनी प्रभावीपणे केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!