ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात घबराट
इराणवर एका रात्रीत ताबा मिळवण्याची धमकी
वॉशिंग्टन:
इराणवर एका रात्रीत ताबा मिळवता येऊ शकतो आणि अशी कारवाई “कदाचित उद्याच रात्री” होऊ शकते, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी दिला. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, संपूर्ण देशावर एका रात्रीत नियंत्रण मिळवता येईल. आणि ती रात्र कदाचित उद्याचीच असू शकते असे ट्रम्प यांनी म्हटल्याने जगभरात घबराट निर्माण झाली आहे
इराणने महत्त्वाची होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याच्या त्यांच्या दिलेल्या अंतिम मुदतीच्या काही तास आधीच ट्रम्प यांनी हा इशारा दिला. त्यामुळे या वक्तव्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
या वेळी ट्रम्प यांच्यासोबत त्यांचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारही उपस्थित होते. यात संरक्षण सचिव पीट हेगसेथ आणि विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांचा समावेश होता. तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांपैकी एरिक ट्रम्प आणि टिफनी ट्रम्प व त्यांचे जोडीदारही उपस्थित होते.
पत्रकार परिषदेला सुरुवात करताना ट्रम्प यांनी हा आमच्यासाठी सर्वोत्तम इस्टरपैकी एक होता असे सांगितले. यावेळी त्यांनी आठवड्याच्या शेवटी ईराणमध्ये अडकलेल्या दोन अमेरिकन वैमानिकांच्या नाट्यमय सुटकेचाही उल्लेख केला. ट्रम्प यांनी सांगितले की शोध आणि बचाव मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 21 विमानांची मदत घेण्यात आली होती. ही विमाने अत्यंत तीव्र शत्रूच्या गोळीबारात उड्डाण करत होती. अमेरिकेचे एक हेलिकॉप्टर गोळ्यांनी अक्षरशः उध्वस्त झाले आहे.
व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या इस्टर एग रोल कार्यक्रमादरम्यान फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प आणि इस्टर बनीच्या वेशातील शुभंकर यांच्या उपस्थितीत ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलण्यापूर्वी त्यांनी दक्षिण लॉनवर उभे राहून म्हटले, “जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांच्याकडे पूल, वीज प्रकल्प किंवा काहीच उरणार नाही. यापेक्षा वाईट गोष्टीही आहेत, पण त्याबद्दल मी अधिक बोलणार नाही.”
रविवारी पहाटे सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी शिवीगाळयुक्त भाषेत इराणच्या नागरी पायाभूत सुविधांवर मंगळवारपासून हल्ले करण्याची धमकी दिली होती. मात्र नंतर ही मुदत एका दिवसाने पुढे ढकलण्यात आली. चर्चेत असलेला युद्धविराम प्रस्ताव अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. पण संघर्ष संपवण्यासाठी तो पुरेसा नाही, असे ट्रम्प यांनी सांगितले.
व्हाईट हाऊसने 45 दिवसांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची पुष्टी केल्यानंतर ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली. इस्टर कार्यक्रमाच्या वेळी ते म्हणाले, हा एक महत्त्वाचा प्रस्ताव आहे. एक मोठे पाऊल आहे. पण तो पुरेसा नाही. तरीही तो खूप महत्त्वाचा आहे. ते पुढे म्हणाले, सध्या चर्चा सुरू आहेत. पुढे काय होते ते पाहू

