अमृततर्फे साताऱ्यात ८ एप्रिलपासून सर्वेक्षण


लक्ष्यित गटातील कुटुंबांचे होणार सर्वेक्षण

Advertisement

सातारा :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजे अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत पोहोचाव्यात यासाठी अमृत संस्थेकडून संपूर्ण महाराष्ट्रातील लक्ष्यित गटातील कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. सातारा जिल्ह्यात हे अमृत परिवार सर्वेक्षण अभियान आठ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत राबवले जाणार आहे. खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना इतर कुठल्याही संस्था किंवा महामंडळे यांचा लाभ मिळत नाही, त्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजेच कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असलेल्या घटकांसाठी अमृत संस्था काम करते. अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटात ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगुनथर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य अशा जातींचा समावेश आहे. विद्यार्थी, तरुण, महिला, व्यावसायिक, शेतकरी अशा विविध घटकांसाठी संस्थेच्या विविध योजना आहेत. या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी परिवार सर्वेक्षण केले जाणार आहे. आठ ते २५ एप्रिल या कालावधीत अमृत संस्थेचे प्रतिनिधी लक्ष्यित गटाशी संपर्क साधणार आहेत. लक्ष्यित गटातील विविध सामाजिक संस्था, संघटना, मंडळे यांच्याकडूनही माहिती घेतली जाणार आहे. वरील जातींमधील व्यक्ती, संस्था, संघटना, मंडळे या कालावधीत अमृत संस्थेच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून आपल्या परिवाराची, समाजाची माहिती देऊ शकतात आणि विविध योजनांची माहिती घेऊ शकतात. लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त व्यक्तींनी अमृत संस्थेकडे आपल्या परिवाराची नोंदणी करून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेने केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9112227638

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!