भाषा शिक्षणाबाबतअनास्था दूर करण्याची गरज


विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांचे प्रतिपादन

पुणे
’मातृभाषा मराठीला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येकाने आपली मातृभाषा शिकलीच पाहिजे.शिवाय राष्ट्रभाषा हिंदी आणि जागतिक भाषा म्हणून इंग्रजीवरही प्रभुत्व मिळवले पाहिजे.या सार्‍याचा पाया हा शिक्षण आणि वाचनामुळे घातला जातो.त्यामुळे, सध्याच्या काळातही पुस्तकांचे महत्त्व आहे. नव्या पिढीत वाचनाची आवड जोपासायला हवी.शासकीय स्तरावर अनेक शिक्षण संस्थांना भेट देण्याचा योग येतो.त्यावेळी भाषा शिक्षणाबाबत अनास्था जाणवते. यात बदल करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.
‘लेखक आपल्या भेटीला’ या सेशनच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या सहकार्याने 22 व्या पुणे बुक फेअरमध्ये आयोजित ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात सातारचे लेखक डॉ. संदीप श्रोत्री आणि पुण्याचे विनोदी हास्य कथाकार बंडा जोशी यांनी उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधला
डॉ. पुलकुंडवार म्हणाले, मी माझ्या दोन्ही मुलांना मराठी शाळेतच शिकवले. मातृभाषेतून शिक्षण घेणे म्हणजे आपल्या अधिक प्रगतीसाठी दारे खले करणे होय. मातृभाषेतील शिक्षण आपल्या कल्पनांचा पाया भक्कम करते. सर्व भाषेतील पुस्तकांच्या प्रसार आणि वाचनासाठी सर्व ते सहकार्य करू, असे अशी ग्वाही त्यांनी दिली.
पुणे बुक फेअरचे पीएनआर राजन आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह श्री शिरीष चिटणीस यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.
डॉ. संदीप श्रोत्री आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की दीर्घायुषी राहण्यासाठी आपल्या पोटापाण्याच्या व्यवसायाच्या जोडीला काहीतरी छंद असावा.त्यामध्ये लेखन वाचन आणि इतर कला यांचा समावेश असायला हवा. लहानपणापासूनच त्यांना निसर्गामध्ये भटकंती करण्याचा छंद होता ते बाळकडू त्यांना त्यांच्या आई-वडिलांकडून मिळाले होते. पुढे रुग्णालय आणि कौटुंबिक जबाबदार्‍या सांभाळत त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले. तसेच रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संस्थेची स्थापना आणि अनेक निसर्ग संवर्धनाचे उपक्रम त्यांनी हाती घेतले. त्यापैकीच एक म्हणजे पुष्प पठार कास बचाव आणि संवर्धन. या साठी त्यांनी पुष्प पठार कास हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी मधून लिहिले.आणि कास पठार चळवळीला शासकीय दरबारी तसेच युनेस्को हेरिटेज मिळण्यासाठी आणि जगभरातील स्वयंसेवी पर्यावरण संवर्धन संस्थांचा ही जागृती आणि पाठिंबा मिळविण्यात ते यशस्वी झाले.पुष्प पठार कास हे पुस्तक केवळ माहितीपत्रक नसून ते एक चळवळीचे माध्यम आहे असे त्यांनी सांगितले. त्यांचे दुसरे पुस्तक म्हणजे पाय नसलेल्या माणसाने माउंट एव्हरेस्ट चढलेला मार्क इंग्लिस याचे चरित्र.
लेखक या व्यक्तीला भेटायला थेट न्युझीलँड मध्ये गेले होते आणि त्यांनी त्याच्यावर काढलेले पुस्तक म्हणजे एका अपंग व्यक्तीने केलेले साहस इतकेच नसून जगभरातील शारीरिक आणि मानसिक अपंग व्यक्तींना उभारी देण्याचे काम करणारे हे पुस्तक आहे.
बंडा जोशी यांनी हास्य कथा कथन देखील केले आणि हास्य कविता सादर केल्या. आयुष्य समाधानी आणि निर्मळ राहण्यासाठी आपण सतत हसत राहिलं पाहिजे. तसेच हसवणार्‍या माणसाला प्रोत्साहन द्यायला हवे असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी लेखक स्वप्नील पोरे तसेच सांगली बँकेचे माजी सह व्यवस्थापक श्री शिवराम राजोपाध्ये, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे माजी वनसंरक्षक श्री पंडितराव आणि श्री गणा जोशी तसेच सौ निलेखा काळे श्री मनेरीकर श्री घाटपांडे, दीपक घाडगे,वसंत कुलकर्णी आणि अनेक वाचक उपस्थित होते

Advertisement

फोटो ओळ
पुणे बुक फेअरमध्ये शुक्रवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्याने ‘लेखक आपल्या भेटीला’ हा उपक्रम झाला. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सह्ते लेखक डॉ. संदीप श्रोत्री आणि बंडा जोशी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे बुक फेअरचे पीएनआर राजन आणि साहित्य परिषदेचे कार्यवाह शिरीष चिटणीस उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!