निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण २२ डिसेंबर रोजी
सातारा
सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने येथील आम्ही पुस्तकप्रेमी समूहाने घेतलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून सोमवार दिनांक २२ डिसेंबर रोजी या स्पर्धेचे बक्षीस वितरण सायंकाळी ५ वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे होणार असल्याची माहिती आम्ही पुस्तकप्रेमी समूहातर्फे देण्यात आली. हा समारंभ आधी १६ डिसेंबर रोजी होणार होता. पण काही अपरिहार्य कारणाने तो पुढे ढकलण्यात आला असून आता तो २२ डिसेंबर रोजी होणार आहे.
सदर बक्षीस वितरण कूपर उद्योग समूहाचे मानव संसाधन विभाग प्रमुख मा. नितीन देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच या कार्यक्रमास अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोष्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, माजी शिक्षणाधिकारी राजकुमार निकम व महिला उद्योजिका क्षमा जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी विजेत्या स्पर्धकांनी या बदलाची नोंद घ्यावी व बक्षीस समारंभास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

