‘एक रफी, एक मुकेश’ कार्यक्रमाला प्रतिसाद
सातारा
साताऱ्यातील रसिकांसाठी दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा आणि विजय साबळे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक रफी, एक मुकेश’ या हिंदी गीतांच्या सुरेल मैफलीचे आयोजन दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये करण्यात आले होते. हिंदी संगीत क्षेत्रात मोहम्मद रफी आणि मुकेश यांच्या गाण्यांनी अढळ स्थान निर्माण केले आहे, त्यांची अजरामर गाणी नव्या पिढीतील गायकांनी सादर करून रसिकांना जुन्या आठवणींच्या दुनियेत नेले.
यावेळी प्रमुख पाहुण्या सुरेखा शेजवळ म्हणाल्या,रफी यांच्या आवाजात प्रेमळ पणा, म्रुदुपणा, प्रार्थने सारखा त्यांचा आवाज आणि मुकेश यांचा अत्यंत दर्दभरा असा
आवाज आहे. आज त्यांची गाणी सर्व गायकांनी गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले. शिरीष चिटणीस नेहमीच सर्व कलाकारांना प्रोत्साहन देत असतात साताराच्या रसिकांचा ऐकण्याचा रियाज होण्यास या कार्यक्रमांमुळे मदत होते.
शिरीष चिटणीस म्हणाले,मुकेश गेले तेव्हा रफी आजारी होते. पण रफी हे त्यांच्या अंत्ययात्रेला आजारी असुनही उपस्थित राहिले.त्यावेळी रफी म्हणाले माझा अतिशय जवळचा मित्र गेला. मुकेश आणि रफी यांची जी गाणी आहेत ती लोकांना प्रचंड आवडत होती आणि आवडत आहेत. विजय साबळे हे साताऱ्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात गाणी कराओके वर म्हणण्यास शिकवीत असून आपल्या विद्यार्थ्यांना गाणी म्हणण्यास स्टेज निर्माण करून देत शिक्षकी योगदान देत आहेत.
कार्यक्रमात ‘ना किसी की आँख का नूर हूँ’, ‘ओ मेरे शाहे खुबा’, ‘आ जा रे अब मेरा दिल पुकारे’, ‘वादा करले साजना’, ‘दिल जो ना कह सका’, ‘तेरी निगाहों पे’, ‘मधुबन में राधिका नाचे रे’, ‘दिल कहे रुक जा रे’, ‘जीत ही लेंगे बाजी हम तुम’, ‘बेखुदी में सनम’ अशी एकापाठोपाठ एक सरगम उधळणारी गाणी रंगली. रफी-मुकेश यांच्या आवाजातील तीच माधुर्य, भावपूर्णता आणि मनाला भिडणारे काव्य रसिकांनी नव्या कलाकारांच्या स्वरांत अनुभवले.
या कार्यक्रमात डॉ. सुनील पटवर्धन, सचिन शेरकर, विजय साबळे, स्मिता शेरकर, सीमा राजपूत व दीपाली घाटगे या कलाकारांनी गाण्यांची उत्कृष्ट सादरीकरणे केली. या कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन विजय साबळे यांचे होते. सूत्रसंचालन ऋतुजा देवी यांनी केले तर ध्वनी व्यवस्था सरगम साऊंड यांनी उत्तम प्रकारे सांभाळली.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिरीष चिटणीस, डॉ. कामिनी पाटील, सुरेखा शेजवळ उपस्थित होते.

