शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या
आर्थिक विवंचनेतून पाऊल उचल्ल्याची शक्यता
पुणे
संत तुकाराम महाराज यांचे 11वे वंशज आणि प्रसिद्ध व्याख्याते शिरीष महाराज मोरे यांनी आज आपल्या राहत्या घरी आर्थिक विवंचनेच्या कारणातून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ह.भ.प शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज होते, ते देहुगाव परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या निधनाने संपूर्ण वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे. शिरीष महाराज यांचे काही दिवसांपुर्वी लग्न ठरले होते, साखरपुडा देखील झाला होता. 20 फेब्रुवारीला त्यांचा विवाह होता, मात्र त्यांनी आधीच असं टोकाचं पाऊल उचलल्याने त्यांच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शिरीष महाराज यांनी आर्थिक विवंचनेतून हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास उपरण्याच्या सहाय्याने त्यांनी गळफास लावून घेतल्याची माहिती आहे. शिरीष महाराज यांनी नुकतंच नवीन घर बांधलं होतं. खालच्या मजल्यावर त्यांचे आई-वडील आणि वरच्या मजल्यावर ते राहत होते. काल (मंगळवारी, ता 5) रात्री मोरे वरती आपल्या खोलीत आराम करण्यासाठी गेले होते. सकाळी साडे आठ वाजल्यानंतरही ते खाली आले नव्हते. त्यामुळे घरातील सदस्य वर गेले. दरवाजा वाजवला पण दार उघडलं जात नव्हतं. आतून प्रतिसाद मिळत नसल्याने घरातील सदस्यांनी दार तोडले. मोरे यांनी पंख्याच्या हुकाला उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांना दिसले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. दरम्यान, प्राथमिक दृष्ट्या आर्थिक विवंचेनेतून टोकाचे पाऊल उचलले असल्याते समजते.
शिरीष मोरे महाराज यांचे देहूतील धार्मिक आणि सामाजिक जीवनात मोठे योगदान होते. ते प्रसिद्ध कीर्तनकार होते आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत असत. त्याचबरोबर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय प्रचारक म्हणूनही ते कार्यरत होते. त्यांच्या निधनामुळे देहूतील आरएसएस कार्यकर्त्यांनीही तीव्र दुःख व्यक्त केले आहे. शिवव्याख्याते म्हणून शिरीष महाराज मोरे यांचा पंचक्रोशीत मोठा नाव लौकीक होता. नुकतंच त्यांचं लग्न देखील ठरलं होतं. त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे.

