नटेश्वराने घडवले समृद्ध संगीत रंगभूमीचे दर्शन


सातारा
पुण्यातील कलांगण अकादमी या संस्थेने, दीपलक्ष्मी पतसंस्था, सातारा यांच्या सहयोगाने ,शाहू कला मंदिर येथे संगीत रंगभूमीचा प्रवास, संगीत रंगभूमीवरील अभिजात मराठी भाषेचे सौंदर्य विविधता, समृद्धी आणि संगीत रंगभूमीवरील स्थित्यंतरे  दर्शविणारा, देखणा प्रयोग सातारकर रसिकांसाठी सादर केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी उदय कुलकर्णी , सुधीर पाध्ये, डॉ. अनंत निमकर, शिरीष चिटणीस, सारंग किरपेकर, संतोष वाघ, चंद्रकांत शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले.

Advertisement

संजय गोसावी आणि अस्मिता चिंचाळकर यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमाची सुरवात संगीत नाटकाच्या प्रथेप्रमाणे सर्व कलाकारांनी “पंचतुंड नररुंडमालधर” ही प्रसिद्ध नांदी सादर करून झाली. त्यानंतर संजय गोसावी आणि ओंकार खाडिलकर यांनी संगीत स्वयंवर या नाटकातील शिशुपाल -रुक्मी यांचा प्रवेश सादर केला. त्याला जोडूनच अस्मिता चिंचाळकर यांनी “नाथ हा माझा मोही खला” हे गंधर्व ठेक्यातील नाट्यगीत साभिनय सादर केले . गंधर्व ठेका हे त्रितालाचे (किंवा अध्धा त्रितालाचे)  वैशिष्ट्यपूर्ण रूपांतर आहे. अस्मिता यांनी ठेक्याचे भान राखत अभिनय आणि गायन यांचा उत्तम समतोल साधला. यानंतर ओंकार खाडिलकर यांनी नारदाच्या तोंडी असलेले “पावना वामना” हे आण्णासाहेब किर्लोस्कर लिखित संगीत सौभद्र या नाटकातील नाट्यगीत सादर केले. अस्मिता चिंचाळकर आणि मृणाल गोसावी यांनी संगीत शारदा या नाटकातील ” म्हातारा इतुका न अवघे” हे गीत आधीच्या संवादासह सादर केले. यावेळचा अस्मिता यांच्या गायन, मुद्राभिनय आणि कायिक अभिनयाला खटकेबाज संवादांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. यानंतर संजय गोसावी यांनी राजसंन्यास या नाटकातील छ. संभाजी महाराजांचा प्रवेश सादर केला. संगीत मानापमान या कृ. प्र. खाडिलकर लिखित नाटकातील लक्ष्मीधर- विलासधर यांच्या संवादाचा प्रवेश संजय गोसावी आणि ओंकार खाडिलकर यांनी सादर केला. याच नाटकातील “नाही मी बोलत नाथा” हे गीत अस्मिता यांनी सादर केले. यावेळी त्यांनी केलेल्या लडिवाळ अभिनयाला प्रेक्षकांनी दाद दिली. राम गणेश गडकरी यांनी लिहिलेल्या ” एकच प्याला” या नाटकातील तळीराम आणि सुधाकर यांचा प्रवेश संजय गोसावी यांनी सादर केला. तळीरामाचे दारूविषयीचे अजब तर्कशास्त्र आणि सुधाकराचे विफलता व्यक्त करणारे टोकाचे विचार राम गणेश गडकरी यांची अलौकिक प्रतिभा दर्शविणारे आहेत. संजय गोसावी यांनी दोन्ही प्रवेश ताकदीने रंगविले. यानंतर सिंधूच्या तोंडी असणारे “कशी या त्यजू पदाला” हे गीत अस्मिता यांनी सादर केले. संन्यस्त खड्ग या नाटकातील “शतजन्म शोधिताना” हे दीनानाथ मंगेशकर यांनी अजरामर केलेले नाट्यगीत ओंकार खाडिलकर यांनी गायले. अस्मिता यांनी मदनाची मंजिरी या विद्याधर गोखले लिखित नाटकातील अंग अंग तव अनंग हे राग सोहनी, बहार, केदार, या रागातील गीत गायले.
“प्रितीचे आम्ही यात्रेकरू” हे गीत गाताना ओंकार खाडिलकर यांनी केलेला चपखल अभिनय प्रेक्षकांची दाद मिळवून गेला. ययाती देवयानी या नाटकातील प्रवेश, मत्स्यगंधा नाटकातील देवव्रताचा प्रवेश रंगत वाढवीत गेले. कट्यार काळजात घुसली या नाटकातील सुरत पिया बिन हे प्रसिद्ध नाट्यगीत आणि त्याला जोडून राग मालकौंस मधील तराना रंगतदार झाला. आशालता बाबगावकर यांनी गायलेले “गर्द सभोवती रान साजणी” हे गीत नाटकात असले तरी ते भावगीतच आहे. अस्मिता यांनी ते उत्तम सादर केले. भैरवी रागातील “अगा वैकुंठीचा राया” या नाट्यगीताने कार्यक्रम संपन्न झाला. या प्रयोगाचे सुयोग्य आणि गतिमान सूत्र संचालन संजय गोसावी आणि ओंकार खाडिलकर यांनी आळीपाळीने केले. उदय कुलकर्णी यांच्या ऑर्गन वादनाने प्रेक्षकांना जुन्या वैभवशाली काळात नेले. स्वरा किरपेकर हिने संवादिनीवर नेटकी आणि पूरक साथ केली. अभिजित जायदे यांनी लयदार आणि रंगत वाढविणारी तबला साथ केली. पार्श्वसंगीत संयोजन मृणाल गोसावी यांनी केले.. सर्व कलाकारांनी शाकुंतल पासून कट्यार पर्यंतचा प्रवास सुसंघटितपणे मांडून सातारकर रसिकांना उत्तम अनुभव दिला. लोकप्रिय संगीत नाटकातील लोकप्रिय नाट्यपदे, नाट्यप्रवेश, स्वगतं, काव्य याद्वारे संगीत रंगभूमीची समृद्धता दर्शवणाऱ्या या कार्यक्रमाला सातारकर रसिकांनीही उत्स्फूर्तपणे दाद दिली..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!