सातारा जिल्ह्याची राजकीय ओळख दृढ करूया: बाबुराव शिंदे
काँग्रेस भवनात स्वातंत्र्यदिन, किसन वीर जयंती
सातारा
देशाच्या राजकारणात महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सातारा जिल्ह्याने ‘ बडा दादा ‘ म्हणून निर्माण केलेली ओळख पुसली जाऊ नये. ही ओळख नव्याने पुन्हा रूढ आणि दृढ करण्याची जबाबदारी काँग्रेस कार्यकर्त्यांवर आली आहे. ती जबाबदारी ओळखून काँग्रेस जनांनी सजग व्हावे, असे आवाहन बाबुराव शिंदे यांनी केले.
येथील काँग्रेस भवन प्रांगणात स्वातंत्र्यदिनानिमित्त ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी निवृत्ती आप्पा बाबर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी स्वातंत्र्यसेनानी किसन वीर यांनाही जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी झालेल्या सभेत श्री. शिंदे बोलत होते .ज्येष्ठ नेते बाबासाहेब कदम, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र शेलार, रफिकभाई बागवान, अल्पना यादव, रजनी पवार, मालन परळकर आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राची देशाला फार मोठी साथ लाभली. छत्रपती शिवराय, लोकमान्य टिळक आणि पुढील काळात यशवंतराव चव्हाण यांच्या रूपाने महाराष्ट्राने देशाला नेतृत्व दिले ,असे सांगून श्री शिंदे म्हणाले, पुढील काळात महाराष्ट्राच्या राजकारणात सातारा जिल्ह्यानेही ‘ बडा दादा ‘,अशी आपली ओळख निर्माण केली होती. ती निर्माण करताना यशवंतरावांना किसन वीर यांची मोठी साथ लाभली होती.
प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र शेलार यांनी भारताचा स्वातंत्र्य दिन, ज्ञानेश्वरांची 750 वी जयंती , किसन वीर यांची जयंती असा विलक्षण योग जुळून आला असल्याची आठवण करून दिली. ते म्हणाले, अनेकांच्या त्यागातून आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य सविधान आणि लोकशाही यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपणां सार्यांवर आहे . ही जबाबदारी ओळखून जनजागृतीचे काम पुढे नेटाने चालवूया.
अल्पना यादव यांचेही यावेळी भाषण झाले.
सुरुवातीला निवृत्त आप्पा बाबर यांचा बाबासाहेब कदम यांच्या हस्ते पुष्पहार, शाल, तिरंगा ध्वजाची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला .काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांनी स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून स्वागत प्रास्ताविक केले .
सेवा दलाचे समन्वयक संदीप माने यांनी आभार मानले.
कार्यक्रमास जगन्नाथ कुंभार, नरेश देसाई, नंदाभाऊ जाधव, नजीम इनामदार, अरबाज शेख अन्वरपाशा खान आदि यावेळी उपस्थित होते.
छायाचित्र ओळी
सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे गोवा मुक्त स्वातंत्र्य लढ्यातील निवृत्ती आप्पा बाबर यांचा सत्कार करताना बाबासाहेब कदम. शेजारी राजेंद्र शेलार मालन परळकर ,अल्पना यादव, रफिकभाई बागवान, रजनी पवार दुसऱ्या छायाचित्रात जयंतीनिमित्त किसन वीर यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना निवृत्ती आप्पा बाबर आणि काँग्रेसचे पदाधिकारी.

