स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ वंदन स्मारक उभे करा:सयाजी शिंदे
मिसाल वतन से मोहब्बत की पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न
सातारा
देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आत्मबलिदान केले , कारावास भोगला अशा स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ वंदन स्मारक उभारून या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ या परिसरात झाड लावावे आणि या स्वातंत्र्य सैनिकांची आठवण चिरकाल ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त करून चित्रपट कलावंत व सह्याद्री देवराईचे संकल्पक सयाजी शिंदे यांनी या उपक्रमास आपण सर्व ते सहकार्य करू असे आश्वासन दिले.
जमीयत उलमा -ए – हिंद , सातारा आणि गेंडामाळ कब्रस्तान ट्रस्ट सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने गेंडामाळ कब्रस्तान येथे दफन झालेल्या नऊ स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ देश आणि राष्ट्रहितासाठी केलेल्या कार्यातून समाजासमोर ठसा उमटवलेल्या देशप्रेमी आणि सेवाभावी कार्य करणाऱ्यांचा ” मिसाल वतन से मोहब्बत की ” हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सयाजी शिंदे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे अध्यक्ष विजय देशपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सन्मान देश प्रेमाचा अभिमान स्वातंत्र्यसैनिकांचा या उद्दिष्टाने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना सयाजी शिंदे यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या बद्दल अभिमान असल्याचे सांगून त्यांनी मिळवलेले स्वातंत्र्य टिकवले पाहिजे त्याचबरोबर पर्यावरणाचे संतुलनही राखले पाहिजे आणि त्यासाठी झाडे लावा व झाडे जगवा ही भूमिका घेऊन सर्वांनी कृतीशील राहावे असे आवाहन केले.
यावेळी बोलताना विजय देशपांडे यांनी स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा हा हिंदू मुस्लिम ऐक्य व समाजातील सहिष्णुता कायम राहणे हाच आहे असे सांगून भ्रष्टाचार मुक्त समाज निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी पैलवान साहेबराव आबाजी पवार (कुस्तीगीर ) यांना स्वातंत्र्य सैनिक उमर बाळूभाई खाटीक पैलवान यांच्या स्मृत्यर्थ विजय दत्तात्रय मांडके (लेखक/ पत्रकार) यांना स्वातंत्र सैनिक मिर्झा मास्तर यांच्या स्मृत्यर्थ , एडव्होकेट चंद्रकांत बापूराव बेबले यांना स्वातंत्र्य सैनिक एड इस्माईल साहेब मुल्ला स्मृती प्रित्यर्थ, सूर्यकांत उर्फ राजू दगडू गोरे यांना स्वातंत्र्य सैनिक इस्माईल नूरमहमद हकीम यांचे स्मृत्यर्थ, विनीत विलास पाटील (माजी सैनिक) यांना स्वातंत्र्य सैनिक इब्राहिम उमर फरास यांचे स्मृत्यर्थ, कन्हैयालाल राजपुरोहित यांना स्वातंत्र्य सैनिक कॉ शेख काका बंडू इनामदार यांचे स्मृत्यर्थ सचिन संभाजीराव शेळके ( ऑटो उद्योजक ) यांना स्वातंत्र्य सैनिक अब्दुल जब्बर इस्माईल हकीम यांच्या स्मृत्यर्थ, यशवंतराव गायकवाड ( शिक्षक ) यांना स्वातंत्र सैनिक मेहताब याकुब शेख सर यांच्या स्मृत्यर्थ तसेच सुनील चौथमल राठी ( उद्योजक ) यांना स्वातंत्र सैनिक शेख शफी इब्राहिम रंगारी यांच्या स्मृत्यर्थ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह शाल व एक रोप देऊन पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी साहेबराव पवार एडवोकेट चंद्रकांत बेबले व विजय मांडके यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी व ज्या अपेक्षेने आपण आम्हाला हा पुरस्कार प्रदान केला आहे त्याबद्दल नेहमीच त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने आम्ही कार्य करू असे यावेळी सत्काराला उत्तर देताना म्हटले.
प्रास्ताविक सादिक भाई शेख यांनी केले आणि त्यांनी या कार्यक्रमाच्या मागची भूमिका स्पष्ट केली.
सूत्रसंचालन सुजित शेख यांनी केले.
या वेळी ऍड दिलावर मुल्ला ,साहेबराव पवार , रेणू येळगावकर , रितेश ननावरे , जमीअत उलमा ए हिंदचे अध्यक्ष मौलाना रियाज , मौलाना जमीर , शहर अध्यक्ष मुफ्ती उबेदुल्लाह , गेंडामाळ कब्रस्थान ट्रस्टचे अध्यक्ष साजिदभाई शेख ,उपाध्यक्ष फारूक शेख आरिफ खान , अझहर मणेर , मुसररत शेख , फरहान बागवान , असिफ खान, हमीद भैय्या शेख व्यासपीठावर उपस्थित होते .

