भटक्या कुत्र्यांना कोण आवर घालणार ?
निर्बिजीकरण होत नाही म्हणून आंदोलन करण्याची गरज
विशेष लेख/प्रसाद चाफेकर
सातारा जिल्ह्यातील कराडलगतच्या कोपर्डे हवेली येथे एका भटक्या कुत्र्याने नुकताच एका ३ वर्षाच्या चिमुरडीवर जीवघेणा हल्ला केला. तिच्या दंडाला तोंडात पकडुन ५० फूट तिला फरपटत नेले. या घटनेने अख्खे कोपर्डे गांव थरारले आहे. जागोजागी मटण, चिकन शॉप असल्याने या भटक्या कुत्र्यांना भुकेल्या पोटी आता छोटी मुलेच दिसू लागली आहेत. केवळ त्या छोट्या मुलीच्या आईच्या मोठ्या आवाजातील आरडा ओरड्याने त्या कुत्र्याने त्या छोट्या मुलीला सोडले. त्या मुलीची आई नसती तर कुत्र्याने काय केले असते याची कल्पनाच करवत नाही. अशा अनेक घटना आपल्या राज्यात अनेक ठिकाणी घडत असतात. मुर्दाड प्रशासन आणि दुर्लक्ष करणारे सरकारी व्यवस्थापन यामुळे या गोष्टी होतच राहणार. मागे देखील मी एक व्हिडिओ या भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करावे यासाठी बनवला होता. जेणेकरून या श्र्वानांची पैदास कमी होईल. त्यांची संख्या नियंत्रणात येईल. कुठल्याही प्राण्याला मारणे चुकीचे आहे.पण त्यांची पैदास तर आपण रोखू शकतो.
उद्या माणसांच्या बरोबरीने श्र्वानांची संख्या झाली तर आश्चर्य वाटायला नको अशी सध्याची परिस्थिती आहे. आज ही भटकी कुत्री रस्त्यात जिकडे तिकडे प्रातः, मध्यांन , सायं तसेच रात्र विधी करून ठेवतात. रस्त्याच्या कडेला गाडी पार्क करताना अगर वाटेत रस्त्यावर आपल्याला हे दृष्टीस पडत असते. प्रत्येकालाच याची किळस वाटते. प्रत्येक माणसाला सध्या आपल्या घराबाहेर दारात कुठल्या भटक्या कुत्र्याने येऊन विधी तर करून ठेवला नसेल ना ? याची भिती भेडसावत असते.त्यासाठी बाटल्यात लाल केलेले पाणी घालून त्या बाटल्या अनेक घराच्या बाहेर ही भटकी कुत्री तेथे फिरकू नयेत म्हणून ठेवलेल्या आपण पाहतो. ही परिस्थिती का आली याचा विचार शासन करणार आहे का ? आपण परदेशात जातो किंवा तिथे एकदा तरी जाण्याचे स्वप्न बघत असतो.परंतु त्या देशांमध्ये असलेली स्वच्छता आपण अंगी बाणवणार आहोत की नाही ? कोणतीही नगरपालिका अगर महानगरपालिका याचा गंभीरपणे विचार करतात का ? ही रस्त्यावरची घाण स्वच्छ करण्याची जबाबदारी ही नगरपालिकेची अगर महानगर पालिकेची आहे. कारण त्यांनीच या प्राण्याची संख्या वाढवली आहे. मादी श्र्वानांचे निर्बीजीकरण न केल्यामुळे ही समस्या अति प्रमाणात भेडसावत आहे.
रस्त्यावरच्या स्वच्छतेचे काय ? सरकारने माणसांनी रस्त्यावर प्रातर्विधी करू नयेत म्हणून प्रत्येक घरात संडास बांधण्यासाठी आर्थिक सहकार्य केले. आता माणसांची जागा भटक्या कुत्र्यांनी घेतली आहे. या भटक्या कुत्र्यांसाठी सरकार निदान सार्वजनिक संडास बांधणार आहे का ? त्या ठिकाणी विधी करण्याची त्या भटक्या कुत्र्यांना सवय लावावी लागेल.त्यासाठी श्वान प्रशिक्षक नेमायचा सरकारचा विचार आहे का ? नगर पालिकेला जर निर्बीजीकरण करायचे नसेल तर त्यांनी ही रस्त्यावर जिकडे तिकडे दिसणारी श्र्वानांची विष्ठा साफ करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. पुण्यासारख्या शहरात अधून मधून या मादी श्र्वानांचे निर्बीजीकरण मोहीम चालू असते. सातारा आणि नगरपालिका असलेली इतर सर्वच शहरे मात्र या बाबतीत अगदीच थंड आहेत. या भटक्या कुत्र्यांची केवळ संख्या वाढत आहे. परंतु त्यांच्या उदरनिर्वाहाचे काय ? त्याची व्यवस्था शासनाने करायला नको का ? केवळ माणसांनी टाकून दिलेल्या अन्नावरच यांनी जगायचे का ? हेच त्यांच्या नशिबी का ? बरं यांची संख्या नुसती वाढत असेल तर हे अन्न त्यांना कसे पुरणार ? शेवटी भुकेने हे भटके श्वान मरत असतील. याचा शासनाने गंभीरपणे विचार करायला हवा. आता महाराष्ट्रातील सगळ्याच सार्वजनिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ,महिला मंडळे यांनी प्रशासना विरोधात भटक्या श्र्वानांचें निर्बिजीकरण होत नाही म्हणून आंदोलन उभारले पाहिजे. एक सजग नागरिक म्हणून प्रत्येकाचीच ही जबाबदारी आहे.
प्रसाद चाफेकर

