सोमवारी डीजेविरोधी निषेध मोर्चा


शासनाने डीजे बंदीबाबत निर्णय घेण्याची मागणी

सातारा
सध्या महाराष्ट्रात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासह सर्व उत्सवांमध्ये डीजे या कर्णकर्कश्श आणि कानठळ्या बसणाऱ्या आवाज यंत्रणेचा वापर केला जातो. त्याच्या निषेधार्थ सर्व संबंधित संस्थांनी मिळून एकत्रितपणे सोमवार दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी साडेचार वाजता गांधी मैदान राजवाडा ते पोवई नाका असा मोर्चा काढायचे ठरवले आहे

Advertisement

डीजे यंत्रणा ही माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक अशी यंत्रणा आहे हे सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना या उत्सवांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कर्णकर्कश्श डीजे यंत्रणेमुळे हृदयविकार, कर्णबधीरता अशा समस्यांचा सामना करावा लागला आहे. गेल्या सुमारे दोन आठवड्यांपासून सातारा आणि परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक संघ, त्यापैकी पुण्यशील सुमित्रा राजे भोसले ज्येष्ठ नागरिक संघ, ज्येष्ठ नागरिक संघ शाहूनगर, अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघ, पूर्वा ज्येष्ठ नागरिक संघ, समता ज्येष्ठ नागरिक संघ, माऊली ज्येष्ठ नागरिक संघ, अभिनव जेष्ठ नागरिक संघ जिहे, भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, समर्थ परिसर जेष्ठ नागरिक संघ, जेष्ठ नागरिक संघ राजवाडा, सहवास महिला जेष्ठ नागरिक संघ, कै. कर्मवीर डॉक्टर मार्तंडराव सूर्यवंशी (चाचा) फाउंडेशन, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (NIMA), इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस् ऑफ इंडिया सातारा शाखा तसेच ज्ञानविकास मंडळ, सातारा आदी १६ संस्था डीजे या कर्ण कर्कश्श यंत्रणेविरोधात एकत्र आल्या आहेत. यापैकी काही संस्थांनी सोमवार दिनांक ४ ऑगस्ट आणि शुक्रवार दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना या डीजे बंदी संबंधात लेखी निवेदन सादर केले आहे. तरी दखील शासनाने डीजे बंदीबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यासाठी सर्व संस्थांनी मिळून एकत्रितपणे सोमवार दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी साडेचार वाजता गांधी मैदान राजवाडा ते पोवई नाका असा मोर्चा काढायचे ठरवले आहे. सदर मोर्चा शांततेच्या मार्गाने केवळ घोषणा देत मार्गक्रमण करणार आहे. त्यादिवशी पोवई नाक्यावर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांना त्यांच्या निवासस्थानी या सर्व संस्थांच्या वतीने डीजेवर बंदी संबंधी निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतर पोवई नाक्यावरील शिवछत्रपतींच्या पुतळ्याला नागरिकांकडून अभिवादन केले जाईल. ज्या सातारकर नागरिकांचा या डीजे यंत्रणेला मनापासून विरोध आहे अशा सर्व सातारकर नागरिकांनी या मोर्चामध्ये अवश्य सहभागी व्हावे असे आवाहन प्रसाद चाफेकर यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!