आपले संविधान गतिमान आणि सक्षम दस्तऐवज


‘संविधान सर्वांसाठी’ पुस्तकाचे डोंबिवलीत प्रकाशन

Advertisement

डोंबिवली
२५ जून १९७५ रोजी लादलेल्या लांच्छनास्पद आणीबाणीत लाखो नेते आणि कार्यकर्ते यांची धरपकड झाली, व्यक्तिस्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य आणि आपल्या संविधानाची मूलभूत चौकट असणारे इतर मूलभूत अधिकार निलंबित करण्यात आले. पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या काळ्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्व नागरिकांना आणि राज्यकर्त्यांना संविधानाची माहिती करून दिली पाहिजे.संविधानाची ओळख करून घेण्याची अनेकांची इच्छा असते पण पुस्तकांचा आकार पाहिला की उत्साह मावळतो.यावर उपाय म्हणून प्रथितयश लेखक श्री माधव जोशी यांनी १२० पानांचे ‘संविधान सर्वांसाठी'( हेडविग मिडिया प्रकाशन) हे पुस्तक लिहिले आहे या पुस्तकाचे प्रकाशन डोंबिवलीत फ्रेंड्स लायब्ररीच्या फ्रेंड्स कट्ट्यातर्फे आयोजित कार्यक्रमात लेखक, अभिनेते श्री. दीपक करंजीकर आणि नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे यांचे हस्ते झाले.
नुकतेच निवृत्त झालेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री अभय ओक यांची या पुस्तकाला प्रस्तावना आहे.
“आपले संविधान अतिशय गतिमान आणि सक्षम असा दस्तऐवज आहे. ते कठोर आहे आणि लवचिकही आहे म्हणूनच गेली ७५ वर्षे टिकून आहे आणि पुढील सातशे वर्षे टिकून राहील. आज प्रसिद्ध झालेले पुस्तक हे अतिशय सोप्या भाषेत आणि फक्त १२० पानात संविधानाची संपूर्ण ओळख करून देते म्हणूनच नवीन शिक्षण अभ्यासक्रमात हे पुस्तक समाविष्ट करुन प्रत्येक शाळेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना वाचायला लावले पाहिजे कारण आपण कोण आहोत, आपले काय हक्क आहेत आणि नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे हे त्यांना कळले पाहिजे असे आग्रही प्रतिपादन श्री करंजीकर यांनी केले.
आणीबाणीमध्ये मिसाखाली १९ महिने कारावास भोगलेले सर्वश्री भा य लोहोकरे, सतीश मराठे, प्रकाश भुर्के आणि कै. आबासाहेब पटवारी यांचेवतीने सुपुत्र उमेश पटवारी यांचा सन्मान करून वंदन करण्यात आले.या प्रसंगी ‘आणीबाणी पुन्हा नाही ‘,’वंदे मातरम् ‘ अशा घोषणा देत पांढरा वेश आणि टोप्या परिधान केलेले आणि आणीबाणीचे साक्षीदार असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते हातात तिरंगा घेऊन पुस्तके प्रकाशनासाठी घेऊन आले.
प्रकाशक श्री चिन्मय पंडित, लेखक श्री माधव जोशी आणि श्री पुंडलिक पै हे व्यासपीठावर उपस्थित होते
फोटो
पुस्तक प्रकाशन प्रसंगी पुंडलिक पै, मिलिंद मराठे,दीपक करंजीकर,माधव जोशी,चिन्मय पंडित


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!