अरिजीत सिंग यांच्या गाण्यांवर आधारित कार्य्रक्रमाला प्रतिसाद
दीपलक्ष्मी पतसंस्था आणि रॉयल म्युझिकल इव्हेंट्स ग्रुपतर्फे आयोजन
सातारा:
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि रॉयल म्युझिकल इव्हेंट्स ग्रुप सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “अष्टगंधार” आठ गायकांची खास मालिका मधील भाग पाचवा गुरुवार बाग समाज मंदिर येथे सादर झाला . हा कार्यक्रम सध्याचा आघाडीचे पार्श्र्वगायक अरिजीत सिंग यांच्या गाण्यांवर आधारित होता. रॉयल म्युझिकल इव्हेंट्सचे प्रसाद मुंद्रावळे यांनी हा कार्यक्रम सादर केला. विशेष आकर्षण म्हणजे ह्या कार्यक्रमासाठी हिंदी सा रे ग म प फेम आणि मराठी ‘सुर नवा ध्यास नवा’ च्या पाचव्या पर्वाची उपविजेती कु. कल्याणी गायकवाड यांनी देखील आपल्या गायकीने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम नानल, डॉ. सौ. कामिनी पाटील, विजय देशमुख, मुकुंद फडके, दीपलक्ष्मीचे चेअरमन शिरीष चिटणीस उपस्थित होते.
आपल्या उद्घाटनपर भाषणात श्रीराम नानल यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतील जुन्या गीतकारांचा आणि संगीतकारांचा आढावा घेताना नवीन गायकांच्या गाण्यात सुद्धा नव कौशल्याचा अंतर्भाव असल्याचे सांगितले. विशेषतः अरिजित सिंग यांच्या गायन क्षेत्रातील कामगिरीचा उल्लेख करताना त्यांनी बद्रीनाथ की दुल्हनिया आणि राजी मधील त्यांच्या गाण्याचे विशेष कौतुक केले. जुन्या पिढीनेही या गायकांच्या गाण्याचा आस्वाद घ्यावा असे सुचवले. दीपलक्ष्मी पतसंस्था व रॉयल इव्हेंट या संस्थांनी आयोजन केलेल्या या कार्यक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
विजय देशमुख यांनी ५०-६० च्या दशकातील संगीतकार व गायक व आत्ताचे संगीतकार व गायक यांची तुलना केली. दोन्ही पिढ्या आपापल्या परीने चांगल्या आहेत पण एक गोष्ट निश्चित संगीत हे समाजाला एकत्र आणते. नवीन कलाकारांना कोणाच्यातरी प्रोत्साहनाची आणि आधाराची गरज असते आणि या सातारा शहरामध्ये दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या माध्यमातून शिरीष चिटणीस हे काम सातत्याने करत असतात. या त्यांच्या स्तुत्य कामगिरीचे आपण सर्वांनी कौतुक केले पाहिजे त्यांचे अभिनंदन केले पाहिजे असेही मत या प्रसंगी त्यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना मुकुंद फडके यांनी गायक अरिजित सिंग यांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला. अनेक समस्यांना सामोरे जाऊन अरिजित सिंग यांनी आपली कारकीर्द यशस्वी केली.अरिजित सिंग यांच्या गायनाला सुफी संगीताची झालर असल्यामुळे त्यांची गाणी ऐकून मनाला एक वेगळा आनंद मिळतो असे त्यांनी सांगितले.अत्यंत कमी वयात अरिजित सिंग याने संगीत क्षेत्रात दैदिप्यमान असे यश मिळवले,त्यामागे त्याचे कठोर परिश्रम कारणीभूत आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ कामिनी पाटील यांनी कराओकेच्या कार्यक्रमातील महिलांच्या वाढत्या सहभागाबद्दल समाधान व्यक्त करताना अरिजित सिंग यांचे १ गाणे अष्टगंधार च्या आशा भोसले यांच्या कार्यक्रमात प्रसाद मुंद्रावळे यांनी म्हंटलेले ऐकले आणि त्यांच्या गायिकेतील ताकद समजल्याचे नमुद केले. शिरीष चिटणीस यांनी साताऱ्याच्या या सर्व कलाकारांना बळ देणे गरजेचे आहे हे सांगत आठ कार्यक्रमापैकी चार कार्यक्रमात अरिजित सिंग, मोहम्मद अझीझ, कुमार सानू आणि एस.पी.बालसुब्रम्हण्यम यांचा समावेश केला याबद्दल आनंद व्यक्त केला. या चौघांचीही गाणी गाणे हे अवघड असून देखील, त्यासाठी गायकांनी परिश्रम घेतले आहेत असे स्पष्ट केले. प्रसाद मुंद्रावळे यांनी या गाण्यांच्या सरावासाठी आपला १० वी शिकत असलेल्या मुलाचे आणि पत्नीचे सहकार्य मिळत असल्याचे सांगितले. अरिजीत सिंग यांची गाणी हा माझा श्वास असल्याचे नमूद करीत, त्यांच्या गाण्यातील मधुरता आणि तरुणाईसाठी स्फूर्ती देण्यातील उत्कटता मला जाणवली हे सांगीतले.
कार्यक्रमाची संकल्पना रॉयल म्युझिकल इव्हेंट्सचे प्रमोद लोंढे यांची आहे व निवेदन सौ राधिका काळे यांचे आहे. प्रसाद मुंद्रावळे यांचे सोबत रॉयलचे इतर गायक त्यांना साथ संगत केली.
रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रसाद मुंद्रावळे, कल्याणी गायकवाड आणि इतर गायक कलाकारांना भरभरून कौतुक आणि प्रोत्साहन दिले.एमएसईबीचे कनिष्ठ आरेखक राजेंद्र शशीकांत माने यांच्या हस्ते अरिजित सिंग यांची गाणी म्हणणारे प्रसाद मुंद्रावळे यांचा सत्कार करण्यात आला

