लाल किल्ल्यात शिवजन्मोत्सवाचा सोहळा उत्साहात


आग्र्याचा लाल किल्ला ही स्वाभिमानाची भूमी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आग्रा,
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही देशाला एक तेजस्वी प्रेरणादायी इतिहासाचे पुन्हा स्मरण करण्याची संधी आहे. शिवरायांची जन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला प्रेरणेची तर आग्र्याचा लाल किल्ला ही स्वाभिमानाची भूमी आहे. आग्रा येथे ज्या ठिकाणी महाराजांना कैद केले होते तेथे पुढील वर्षी स्मारकाचे काम सुरु झालेले असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

शिवजयंतीनिमित्ताने आग्रा येथील ऐतिहासिक लाल किल्ला येथे अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘शिवजन्मोत्सव भारतवर्ष का’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील, उत्तर प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार प्रशांत बंब, मीना बाजार ट्रस्टचे अनिल गुप्ता, कार्यक्रमाचे आयोजक व प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या अनोख्या महोत्सवाच्या आयोजनाचे हे चौथे वर्ष आहे.

Advertisement

आग्रा येथील लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्याची परंपरा ही वैशिष्ट्यपूर्ण असून यापुढे ती निष्ठेने जपली जाईल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, आग्रा येथील शिवाजी महाराजांना कैद केलेल्या जागेवर स्मारक उभारण्याचा संकल्प गेल्या जयंतीदिनी आम्ही सोडला होता. हे स्मारक उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने समिती गठित केली. उत्तर प्रदेश सरकारनेही जमीन अधिग्रहणासंदर्भात मंत्रिमंडळात निर्णय घेत सहकार्य केले असून या स्मारकाच्या निर्मितीला लवकरच गती मिळेल. तसेच पुढच्या वर्षापासून या जागेवरही जयंती साजरी केली जाईल. शिवरायांचा इतिहास महाराष्ट्रात शिकवला जातो तो आता देशभरात शिकवला जावा या जनभावनेच्या आदर करून नव्या सीबीएसईच्या पुस्तकात आता शिवरायांच्या इतिहासाला २० पाने दिली आहेत. यापूर्वी केवळ एका परिच्छेदात हा इतिहास सांगण्यात आला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने हा इतिहास आता सर्वत्र पोहोचत असल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीती आणि न्यायदानाचा गौरव करत महाराजांनी जगाला दिलेली गनिमी काव्याची युद्धपद्धती आजही तितकीच प्रभावी असल्याचे सांगितले.
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सांगितले की, शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेमागे राजमाता जिजाऊंनी केलेले संस्कार आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची दिलेली प्रेरणा ही मुख्य शक्ती होती.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देतांना सांगितले की शिवाजी महाराजांनी स्वतःच्या सुखाचा त्याग करून आपले संपूर्ण जीवन जनता, देश आणि धर्मासाठी समर्पित केले. त्यांनी केवळ स्वराज्यच नाही, तर रयतेला स्वाभिमान आणि स्वभाषा दिली.
मंत्री उपाध्याय यांनी सांगितले की आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारे एक भव्य आणि जागतिक दर्जाचे स्मारक साकारले जात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने आग्र्यातील ‘या स्मारकाचे अंतिम टप्प्यात असून उर्वरित कायदेशीर प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद पाटील यांनी केले.
शिवरायांचे गडकोट चढण्याचे विक्रम करणारी शर्विका म्हात्रे हिचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या भव्य शिवजयंती सोहळ्यात महाराष्ट्रातून आलेल्या विविध कलाकारांकडून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनगौरव करणारी गीते,शिवजन्माचा पारंपरिक पाळणा,महाराष्ट्र राज्य गीत “गर्जा महाराष्ट्र माझा”, शिवाजी महाराजांच्या जीवनावरील नाटिका , शिवछत्रपतींचा पोवाडा आदींचा समावेश होता.
आग्रा किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सादर होणारा निऑन लाईट आणि लेझर शो हा या कार्यक्रमाचे एक आकर्षण ठरले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत छत्रपती शिवरायांची गौरवगाथा ‘इंडियाज गॉट टॅलेंट” या स्पर्धेतून प्रसिद्ध झालेले पुण्यातील विवेक पाटील यांनी सादर केली. श्रेया बुगडे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!