वाचन विद्यार्थ्यांना यशाच्या वाटेवर घेऊन जाते:श्रीराम नानल


जनवाचक चळवळीतर्फे वर्येमध्ये पुस्तकांचे वाटप

सातारा
अखंड वाचनाची सवय विद्यार्थ्यांना यशाच्या वाटेवर घेऊन जाते असे उद्गार जनवाचक चळवळीचे मुख्य समन्वयक श्रीराम नानल यांनी काढले. वर्ये ( तालुका सातारा ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना जनवाचक चळवळीतर्फे बालसाहित्याच्या पुस्तकांची भेट देण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक प्रवीण ननावरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. केंद्रप्रमुख सुनंदा पवार या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
श्रीराम नानल यांनी आपल्या भाषणात जनवाचक चळवळीची माहिती उपस्थितांना दिली. पुणे,मुंबई, नाशिक येथील बरेच नागरिक चळवळीला पुस्तके देऊ इच्छितात असे ते म्हणाले. लातूरचे प्रख्यात कवी भरत सातपुते यांनी मोठ्या संख्येने स्वतःची पुस्तके चळवळीला दिली तसेच मुंबई येथील विवेक जोगळेकर यांनी बालसाहित्याची पुस्तके घेण्यासाठी मोठ्या रकमेची आर्थिक मदत केली याचा नानल यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.
प्रसिद्ध लेखक व नव चळवळीला प्रोत्साहन देणारे प्राथमिक शिक्षक सुनील शेडगे यांनी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना खूप फायदा होऊन स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी ते सक्षम होतील असे सांगितले.
प्रमुख पाहुणे प्रवीण ननावरे यांनी या चळवळीला सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तर समारंभाच्या अध्यक्षा सुनंदा पवार यांनी जनवाचक चळवळ राबवीत असलेले उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. हा समारंभ घेण्यासाठी खूप परिश्रम घेतलेले श्री हिंदुराव ननावरे यांनी ही चळवळ ठिकठिकाणी पोचवणार असल्याचे नमूद केले.
या समारंभात जनवाचक चळवळीचे सहसमन्वयक किरण गाडे तसेच उज्वला नानल याही उपस्थित होत्या.
ही पुस्तके घेताना पुण्याच्या दिलीपराज प्रकाशनचे मधुर बर्वे यांनी पुस्तकाच्या किमतीवर भरघोस सूट दिल्याचे नानल यांनी नमूद केले.
मुख्याध्यापिका ललिता वाघमारे यांनी स्वागत केले. नीता कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. लीना जाधव यांनी आभार मानले. श्रेया जगताप यांनी हार्मोनियम वर अभंग सादर केला. प्रितेश जाधव याने वक्तृत्वातून यशवंतराव चव्हाण यांचा जीवनपट उलगडत उपस्थितांची मने जिंकली. गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे तसेच विस्तार अधिकारी जयश्री गुरव यांनी उपक्रमात शुभेच्छा दिल्या.

Advertisement

फोटो ओळ
पुस्तकांसमवेत विद्यार्थी, सर्व मान्यवर तसेच सर्व शिक्षक वृंद


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!