महाराष्ट्र शासन, मायक्रोसॉफ्ट यांच्यात सामंजस्य करार


राज्यात ‘एआय’ सेंटर्स ऑफ एक्सलन्सची स्थापना होणार
मुंबई
राज्यात बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार झाला.
करारावर महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मायक्रोसॉफ्टचे वेंकट कृष्णन यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव नवीन सोना, विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले तसेच मायक्रोसॉफ्टचे विक्रम काळे, विशाल घोष आदी उपस्थित होते.
हा सामंजस्य करार महाराष्ट्र शासनाच्या “डिजिटल भारत, आत्मनिर्भर महाराष्ट्र” या संकल्पनेला बळकटी देणारा आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने शासन अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि पारदर्शक होईल, ज्याचा थेट लाभ नागरिकांना मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Advertisement

राज्यभरात तीन ‘ए.आय.’ उत्कृष्टता केंद्रे

मुंबई– भूगोल विश्लेषण केंद्र : भूगोल-संबंधित प्रगत विश्लेषणासाठी, जी.आय.एस. आणि उपग्रह इमेजरीद्वारे धोरणात्मक निर्णय प्रक्रियेस सहाय्य. हे केंद्र मुख्य सचिव कार्यालयात कार्यरत राहील. उपग्रह इमेजरी विश्लेषण, भू-सांख्यिकी व्यवस्थापन आणि जी.आय.एस.-आधारित वापराच्या माध्यमातून शासनाच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेस मोठी मदत होईल.

पुणे – न्यायवैज्ञानिक संशोधन आणि ‘ए.आय. केंद्रः’ गुन्हे तपास आणि न्यायवैज्ञानिक विश्लेषणासाठी ए.आय.चा उपयोग वाढविणे.

नागपूर – मार्व्हेल केंद्रः कायद्यांची अंमलबजावणी, दक्षता आणि सुधारित प्रशासनासाठी ‘ए.आय.’वर आधारित संशोधन आणि प्रशिक्षण तसेच, राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना ‘ए.आय.’ प्रशिक्षण व मायक्रोसॉफ्ट प्रमाणपत्रे प्रदान केली जातील. एम.एस. लर्न या जागतिक दर्जाच्या प्लॅटफॉर्मद्वारे प्रशासन अधिक सक्षम व तंत्रज्ञानस्नेही होईल.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!