सातारच्या आर्य शहाचा झंझावात


16 षटकार,26 चौकारांसह 71 चेंडूत द्विशतक
विशेष वृत्त/शरद महाजनी

Advertisement

सातारा
सातारच्या ऐतिहासिक छत्रपती शाहू स्टेडियमवर सातारच्या आर्य शहाने झंझावती खेळी करत सोळा षटकार आणि 26 चौकारांसह अवघ्या 71 चेंडूत द्विशतक झळकावले.सातारच्या क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वोत्तम कामगिरी तर ठरलीच,पण भारतीय क्रिकेटच्या इतिहासात टी 20 क्रिकेट स्पर्धेत इतक्या कमी चेंडूत 206 धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.
शाहू स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या स्व.नीलकंठ धादमे स्मृती टी 20 क्रिकेट स्पर्धेत आर.सी.स्पोर्ट्स क्लबकडून खेळताना आर्य शहाने ही झंझावती खेळी केली.शाहू स्टेडियमचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष.याच वर्षात अशी सोनेरी कामगिरी करणारा आर्य क्रिकेट प्रेमींच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.डावखुरा अष्टपैलू क्रिकेटपटू अशी त्याची ओळख आहे.आक्रमक फलंदाज,डावखुरा फिरकी गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी ओळख असलेल्या आर्यला क्रिकेटचे बाळकडू अष्टपैलू क्रिकेटपटू अशी ओळख असलेले त्याचे वडील प्रशांत शहा यांच्याकडूनमिळाले.
लहानपणापासून तो वडिलांबरोबर शाहू स्टेडियमवर सराव करू लागला.क्रिकेटचे निसर्गदत्त कौशल्य लाभलेल्या आर्यने लहान वयात चमक दाखवली.स्थानिक स्पर्धेत चमकदार कामगिरी करत असताना त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सातारा जिल्हा संघाकडून तो 14,16,19,23 वर्षाखालील गटात खेळला.शिवाजी विद्यापीठ संघात पण त्याची वर्णी लागली.19 वर्षाखालील स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी करून सुध्दा त्याला महाराष्ट्र संघात संधी मिळाली नाही.पण त्यामुळे डगमगून न जाता त्याने सातारा,पुणे येथील स्पर्धेत अष्टपैलू खेळ केला.त्याच्या या झंझावती खेळीची झलक पाहिलेले मुंबईचे माजी रणजीपटू अजित सावंत खूप प्रभावित झाले असून त्यांनी त्याला मुंबईत येऊन खेळण्याचे आमंत्रण दिले आहे. नाशिक येथील एका संघाने पण त्याला आमंत्रित केले आहे.
अशा या गुणी अष्टपैलू क्रिकेटपटूचे भविष्य उज्ज्वल आहे,पण त्याला योग्य संधी तसेच योग्य मार्गदर्शन,कोचिंग आणि गॉडफादर मिळाला तर तो सातारचे नाव क्रिकेटच्या इतिहासात अजरामर करेल यात शंका नाही.त्याच्या यशासाठी सातारकर क्रिकेटप्रेमी नेहमीच पाठीशी खंबीरपणे उभे राहतील यात शंका नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!