औरंगजेब हा सध्या संयुक्तिक मुद्दा नाही


नागपूरच्या घटनेनंतर संघाचं मोठं वक्तव्य

मुंबई
समाजिक स्वास्थ उत्तम ठेवण्यासाठी कुठलाही हिंसाचार हा चांगला नाही. राष्ट्रीय स्वयंसवेक संघ कोणत्याही हिंसाचाराचे समर्थन करत नाही. नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेचा पोलिस तपास करत आहेत. मात्र, औरंगजेबाचा मुद्दा आता संयुक्तिक नाही, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सुनिल आबेकर यांनी मांडली आहे.
राज्यात नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात ही घटना घडली आहे. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात दोन गटातील तणावावरुन झालेल्या हिंसाचारानंतर भाजपच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. राज्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विचारांशी जोडलेल्या बंजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने आंदोलन सुरू केलं आहे. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उखडून टाका, महाराष्ट्रात क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर नको, अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली आहे. त्यातच, महायुतीचे मंत्री नितेश राणे यांच्या सातत्याने येणाऱ्या वक्तव्यावरूनही दोन समाजात तेढ निर्माण होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे, राज्यात औरंगजेबाची कबर हा मुद्दा केंद्रस्थानी असताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हा मुद्दा सध्या संयुक्तिक नसल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारत सुनिल आंबेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन संघाची भूमिका मांडली.
औरंगजेब हा संयुक्तिक मुद्दा नाही, याचा अर्थ औरंग्याचा उदात्तीकरण होता कामा नये. औरंगजेबाच्या विषयावर समाजा-समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून संघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे, त्यांचे विचार आणि त्यांच्या पराक्रमी इतिहासावर श्रद्धा ठेवावी हा त्यामागचा भाग आहे, असेही भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.

Advertisement

काँग्रेसकडून संघाच्या भूमिकेचं स्वागत
आरएएसने जर ही भूमिका घेतली असेल तर ती योग्यच आहे. कारण, देशासमोर अनेक मोठे प्रश्न आहेत, रोजगार, बेरोजगारी आणि देशाची आर्थिकता लक्षात घेता सध्या देश आंदोलनात झुकणं हे परवडणारं नाही, असे काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी म्हटले.
राष्ट्रवादीकडूनही स्वागत
औरंगजेबाचा मुद्दा हा संयुक्तिक नाहीच, ही भूमिका संघाने घेतली असेल तर त्याचं कौतुक आणि अभिनंदन. खरंतर आमच्या आणि संघाच्या विचारधारा वेगळ्या आहेत, आम्ही आरएसएसचा पूर्णपणे विरोध करतो. पण, ज्या प्रकारे औरंगजेबाचा मुद्दा काढून दंगली घडवल्या जातात त्याचा विरोध आहे. त्यामुळे हा मुद्दा संयुक्तिक नाहीच. जर संघाने ही भूमिका जाहीर केली असेल तर ते योग्य आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील त्यांचं स्वागत केलं आहे.

नागपूरमधील हिंसाचार सुनियोजित – शेंडगे
लोकशाही मार्गाने आम्ही नागपुरात आंदोलन केले होते. आम्ही मागणी करत पुतळा दहन केला. मात्र, त्यानंतर तिथे औरंगजेबाचे नारे लावण्यात आले. औरंगजेब हमारा बाप है, औरंगजेब झिंदाबाद अशा घोषणा करण्यात आल्या, हे नारे लावून चिथावणी कोणी केली, असा सवाल विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले. तसेच, आम्ही पुतळ्याला जे कापड गुंडाळलं होतं ते कुणाच्या धार्मिक भावनेला ठेस पोहोचवणारं किंवा दुखावणारं नव्हतं. हिंदू कदीही कोणाच्या धार्मिक भावनेला दुखावणारं कृत्य करत नाही, असेही शेंडे यांनी म्हटलं. नागपूरमधील रात्रीची घटना ही योजनापूर्व होती, यात बाहेरील हस्तक्षेप आहे. कारण, दररोज तिथे 50 लोकं येतात पण त्या दिवशी 1500 ते 2 हजार लोकं आली होती, असेही शंडे यांनी म्हटले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!