दिशा सालियनच्या वडिलांचे खळबळजनक आरोप


दिशाच्या मृत्यूची नव्यानं चौकशी करण्याची मागणी

Advertisement

मुंबई
अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या आई,वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत दिशाच्या मृत्यूची नव्यानं चौकशी करण्याची मागणी केली आहे. आमची लेक आत्महत्या करु शकत नाही. तिची हत्याच झाली आहे आणि त्या हत्येचा संबंध सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी आहे, असा खळबळजनक दावा दिशाच्या आई, वडिलांनी केला आहे. या प्रकरणी शिवसेना उबाठाचे नेते, आमदार, माजी मंत्री आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी दिशाच्या आई, वडिलांनी याचिकेतून केली आहे.
८ जून २०२० रोजी दिशाचा मुंबईतील एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला होता. दिशा सालियानची सामूहिक बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणेंनी केला होता. त्यावेळी दिशाच्या कुटुंबियांनी तो आरोप फेटाळून लावला होता. आमच्या लेकीची बदनामी थांबवा, असं आवाहन त्यांनी केलं होतं. पण आता दिशाच्या आई, वडिलांनी दिशाची हत्याच झाली असल्याचा दावा करत यूटर्न घेतला आहे. त्यांनी आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
माझ्या लेकीची हत्याच झाली आहे. ती आत्महत्या करु शकत नाही, असा दावा दिशाच्या वडिलांनी केला. ‘माझ्या लेकीच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या. ती १४ व्या मजल्यावरुन पडली असती, तर शरीरावर कुठेतरी जखमा झाल्या असत्या. पण चेहऱ्यावर, डोक्याला कुठेही इजा झालेली नव्हती,’ असं दिशाचे वडील सतीश सालियान यांनी सांगितलं.
दिशावर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आमची दिशाभूल केली. पेडणेकर यांनी आम्हाला नजरकैदेत ठेवलं. पुरावे खरे मानण्यास भाग पाडलं, असे गंभीर आरोप दिशाच्या वडिलांनी केले आहेत. आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया यांच्यासह मुंबई पोलिसांवरही दिशाच्या वडिलांनी खळबळजनक आरोप केले आहेत. नितेश राणेंच्या आरोपात तथ्य असल्याचंही दिशाच्या वडिलांनी याचिकेत नमूद केलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.
माझ्यावर कोविड काळात भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्या आरोपांना आम्ही सामोरे गेलो होतो. कारण आम्ही काही चुकीचं केलंच नव्हतं, असं माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. दिशानं आत्महत्या केली त्यावेळी पेडणेकर मुंबईच्या महापौर होत्या. ‘दिशाच्या मृत्यूनंतर तिचे वडील अनेकदा महापौर कार्यालयात आले होते. त्यांना मी भेटले, तेव्हा तिथे माध्यमांचेही प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. आता सव्वा तीन वर्षांनंतर दिशाच्या वडिलांच्या मनात वेगळ्याच गोष्टी येत असतील, तर त्यामागे नेमकं कोण असावं? असा प्रश्न पडतो,’ असं म्हणत पेडणेकरांनी संशय व्यक्त केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!