खेळपट्टीचा बाऊ कशाला


 

विशेष लेख/शरद महाजनी

Advertisement

गेल्या काही वर्षात ,विशेष करून कॅमेरे लावून क्रिकेटची खेळपट्टी,मैदान दाखवून त्या संदर्भात एक्सपर्टची मते जाणून घेण्याचा सिलसिला सुरू झाला तेव्हापासून क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असे वाटते.सामना हरला की ही खेळपट्टी खलनायिका होते आणि ती तयार करणारे सह खलनायक.हा प्रकार फक्त भारतात घडतो असे नाही तर क्रिकेट खेळले जात असलेल्या सर्व देशात पण घडतो
या खेळपट्टी नात्यावरून मला तो जुना काळ आठवतो.अगदी सर डॉन ब्रॅडमन यांच्या जमान्यातला. तेव्हा यजमान संघाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून खेळपट्टी तयार केली जायची.समोरच्या संघातील खेळाडूंची बलस्थाने कोणती,कच्चे दुवे कोणते याचाही विचार केला जायचा.शिवाय त्या त्या देशातील वातावरण,हवामान विचारात घेतले जायचे.सामना सुरू होण्यापूर्वी आणि चालू असताना खेळ संपला की खेळपट्टी कव्हर केली जात नसे.त्यामुळे ती कधी सोज्वळ सुनेसारखी वागायची किंवा कधी खाष्ट सासू सारखी.पण कोणाला तक्रार करायला जागा नसे.कारण प्लेइंग कंडीशन आधीच विचारात घेतल्या जात असत.अशा खेळपट्टीवर कस लागायचा,पण त्यामुळे खरी गुणवत्ता,लढाऊ वृत्ती दिसायची.
क्रिकेट जसे आधुनिक झाले आणि प्रचंड पैसा आला तसे बदल होत गेले.तरीही यजमान संघास अनुकूल अशा खेळपट्ट्या तयार केल्या जातात. भारत,पाकिस्तान,श्रीलंका आदी देशात फिरकीला अनुकूल तर इंग्लंड,ऑस्ट्रेलिया,न्यूझीलंड,दक्षिण आफ्रिका,वेस्ट इंडीज आदी देशात जलद गोलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्या तयार करतात. या खेळपट्ट्या आणि परिस्थितीशी जुळवून घेत जे खेळाडू उत्तम कामगिरी करतात ते खरे जागतिक दर्जाचे खेळाडू.भारतात असे भरपूर क्रिकेटर आहेत की जे भारतात आणि विदेशात उत्तम कामगिरी करतात.इतर देशांचे अनेक खेळाडू असे आहेत.पण अलीकडे काही वर्षात खेळपट्टीचा बाऊ करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातही वन डे आणि टी 20 क्रिकेट फोफावल्याने सर्वांना मनासारखी खेळपट्टी हवी असते.त्यामुळे गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी मिळाली की फलंदाजांच्या कपाळावर आठी पडते.पण जे खरे ,कसलेले खेळाडू असतात त्यांचा दर्जा इथे पण सिद्ध होतो.
अलीकडे तर मिडियाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन प्रत्येकाला आपण हुशार असल्याचा भास होऊ लागला आहे.गळ्यात माईक,कॅमेरा आला की उठ सूठ कोणीही एक्सपर्ट असल्यासारखे बोलू लागतात.अनेकदा त्यांचे अंदाज चुकतात.पण अशावेळी ते सावरून घेत सारवासारव करण्यात पटाईत असतात.
एकूण काय तर खेळपट्टी हवी तशी बनवणे ही वाटते एवढी सोपी गोष्ट नाही.पण तरीही क्युरेटरवर वाढता दबाव,पुन्हा मीडियाची आणि एक्सपर्ट लोकांची करडी नजर,काही खेळाडूंची नाटके असे प्रकार घडत असतात.त्यावर काही उपाय केले जातील असे वाटत नाही.पण खऱ्या खेळाडूंनी अशा. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपले नाणे खणखणीत वाजवावे,म्हणजे या चर्चा आपोआप थांबतील आणि क्रिकेटची मजा घेता येईल..
शरद महाजनी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!