लोकसभा मतदानासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण


सातारा

Advertisement

लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी कोरेगाव विधानसभा  मतदार संघ अंतर्गत कर्मचाऱ्यांना दोन दिवसाचे प्रशिक्षण उत्साहात पार पडले .यावेळी ४५० केंद्राध्यक्ष आणि इतर मतदान अधिकारी असे मिळून १५६९  इतक्या मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांना येथील डीपी भोसले कॉलेजमध्ये सर्वंकष  प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी अभिजीत नाईक तहसीलदार डॉ.संगमेश कोडे, निवडणूक नायब तहसीलदार श्रीमती सारिका शिंदे, गटशिक्षणाधिकारी तथा मनुष्यबळ पथकाचे नोडल अधिकारी धनंजय चोपडे, विविध संबंधित पथकांचे नोडल अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. श्री. नाईक यांनी सांगितले की, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्राध्यक्ष आणि पोलिंग ऑफिसर यांना प्रशिक्षित करण्यात येत आहे. कायदेशीर तरतुदी, निवडणूक आयोगाचे निर्देश ही प्रकरणे,मतदान प्रक्रिया कशी पार पाडावी याचे प्रशिक्षण अधिकाऱ्यांनी दिले. मतदान प्रक्रियेत जे वेगवेगळे नमुने भरावयाचे आहेत, लिफाफे तयार करावयाचे आहेत त्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन बाबतची माहिती प्रांत अधिकारी तसेच तहसीलदारांनी दिली. सर्व कर्मचाऱ्यांना मतदानादरम्यान सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहेत. क्षेत्रीय अधिकारी,तलाठी, कोतवाल, मंडल कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी, अभियंता इत्यादी कर्मचारी, अधिकाऱ्यांची विविध पथके प्रशिक्षणासाठी कार्यरत करण्यात आली होती. हजेरी पथक, ईव्हीएम मशीन प्रात्यक्षिक पथक, साऊंड सिस्टिम पथक, मंडप व पार्किंग पथक,फॉर्म क्रमांक 12 आणि 12 ए जमा करणे यासाठीचे पथक इत्यादी पथके नेमण्यात आली होती. नायब तहसीलदार उदय कदम आणि संदीप चव्हाण यांनी यासंदर्भात नोडल अधिकारी म्हणून कर्तव्य बजावले. “प्रशिक्षण उत्कृष्टरित्या पार पडले असून नियुक्त केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांचा प्रतिसाद चांगला आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडेल”, अशी अपेक्षा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी व्यक्त केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!