सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीनचा लोकार्पण सोहळा
रोटरी क्लब ऑफ करवीरतर्फे कौटुंबिक न्यायालय येथे उपक्रम
कोल्हापूर:
महिला दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ करवीरने एक अभिनव उपक्रम राबविला आहे. रोटरी क्लब ऑफ करवीरने कौटुंबिक न्यायालय, कोल्हापूर येथे सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीनचं उद्घाटन केलं. या उपक्रमाचा उद्देश महिलांच्या आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या बाबतीत जागरूकता निर्माण करणं आणि त्यांना सॅनिटरी पॅड्स सहज उपलब्ध होण्यासाठी आवश्यक त्या सुविधा प्रदान करणं आहे.
उद्घाटन समारंभाला कौटुंबिक न्यायालय कोल्हापूरचे न्यायाधीश डॉ. प्रशांत अग्निहोत्री हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते वेंडिंग मशीनचा लोकार्पण सोहळा रोटरी क्लब ऑफ करवीरचे अध्यक्ष कुशल पटेल यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रोजेक्ट चेअरमन म्हणून स्वप्निल कामत यांनी काम पाहिले.
न्यायाधीश अग्निहोत्री यांनी हा प्रोजेक्ट महिलांसाठी महत्वाचा असल्याचे नमूद केले. तसेच न्यायालयामध्ये येणाऱ्या सर्व महिलांनी त्याचा वापर करावा असे आवाहन केले. या योजनेमुळे महिलांना मासिक पाळीच्या वेळी आवश्यक असलेल्या सॅनिटरी पॅड्सची सुविधा सहजपणे उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे त्यांचा शारीरिक आणि मानसिक आराम सुनिश्चित होईल.
रोटरी क्लब ऑफ करवीरच्या नावीन्यपूर्ण तसेच सामाजिक प्रश्नांची उकल साध्य करण्याच्या अनुषंगाने नियोजलेल्या या उपक्रमामुळे महिलांच्या कार्यकर्तृत्वाप्रती आदर सन्मान व्यक्त करण्याची संधी प्राप्त झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना रोटरी क्लब ऑफ करवीरचे अध्यक्ष कुशल पटेल म्हणाले, आजचा हा सोहळा केवळ एका मशीनच्या लोकार्पणाचा नाही, तर समाजातील महिलांच्या आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्याचा दिवस आहे. महिलांचे आरोग्य, विशेषतः मासिक पाळीदरम्यानची स्वच्छता, हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय असून, समाजात अजूनही त्याबाबत काही प्रमाणात जागरूकतेचा अभाव दिसून येतो.
कौटुंबिक न्यायालयाच्या परिसरात असलेली सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन महिला व न्यायालयात येणाऱ्या व्यक्तींना उपलब्ध होईल. यामुळे महिलांना अत्यंत सोयीस्कर पद्धतीने वेंडिंग मशीनचा वापर करता येणार आहे.रोटरी क्लब ऑफ करवीरच्या या उपक्रमामुळे महिला सशक्तिकरण आणि आरोग्यविषयक योग्यतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकलं आहे.
यावेळी कौटुंबिक न्यायालय कर्मचारी, रोटरी चे सेक्रेटरी नारायण भोई, ट्रेजरर निलेश भादुले,माजी अध्यक्ष दिलीप प्रधाने, उदय पाटील, प्रमोद चौगुले, तसेच सदस्य शीतल दुग्गे, ऍड संदीप पवार, ऍड किरण खटावकर तसेच स्थानिक समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी अध्यक्ष दिलीप शेवाळे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन स्वप्नील कामत यांनी केले.

